1 सप्टेंबरला सरकारला जोडे मारा आंदोलन; महाविकास आघाडी आक्रमक

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंसह प्रमुख नेत्यांचा सहभाग

मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये भ्रष्ट महायुती सरकारबद्दल प्रचंड संताप आहे. कमिशनखोर मिंधे सरकार जबाबदारी टाळून या दुर्घटनेचे पाप नौदलावर ढकलत आहे. या निर्ढावलेल्या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारविरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीने 1 सप्टेंबर रोजी ‘सरकारला जोडे मारा’ आंदोलनाची हाक आज देण्यात आली. गेटवे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येणार असून त्यात तमाम शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

मातोश्री निवासस्थानी आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते – खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन 1 सप्टेंबरच्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी हुतात्मा स्मारकास वंदन करून गेटवे ऑफ इंडिया येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाणार आहोत. तो पुतळा उभारून कित्येक वर्षे झाली तरी तो मजबुतीने उभा आहे. तिथे निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी ‘सरकारला जोडे मारा’ आंदोलन करण्यात येईल. त्यात आपल्यासह शरद पवार, नाना पटोले व आघाडीचे अन्य नेते सहभागी होतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.