खंडणीसाठी अपहरण; सहाव्या आरोपीला अटक

माझगावमधील बांधकाम व्यावसायिकाचे 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने आणखी एकाला अटक केली. मजहर शाकिर ऊर्फ शानू शहा असे त्या आरोपीचे नाव असून ही या गुह्यातील सहावी अटक आहे.

माझगाव येथील रहिवासी असलेले आकिब हिजफूर रेहमान अन्सारी यांचे 23 नोव्हेंबर रोजी अपहरण झाले होते. त्यांच्याकडे अपहरणकर्त्यांनी दहा कोटींची खंडणी मागितली होती. मात्र हा प्रकार कळताच गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तत्काळ तपास सुरू करून पाच अपहरणकर्त्यांना पकडून अन्सारी यांची सुखरूप सुटका केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करीत असताना मजहर शाकिर हा आरोपी मध्य प्रदेशातील धार जिह्यात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार खंडणीविरोधी कक्षाच्या पथकाने धार जिल्हा गाठून मजहरच्या मुसक्या आवळल्या. त्याला पकडून मुंबईच्या किल्ला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात आधी अटक झालेले इलियास बचकाना व त्याच्या अन्य चौघा साथीदारांची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे.