महाविकास आघाडीत वंचितसह सहा पक्षांचा समावेश; हुकूमशाहीविरोधी लढय़ाला आणखी बळ

भाजपच्या हुकूमशाही विरोधात उभी ठाकलेली महाविकास आघाडी आज आणखी भक्कम झाली. वंचित बहुजन आघाडीसह आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, सीपीआय, जनता दल युनायटेड आणि समाजवादी पार्टीचा आघाडीत समावेश करण्यात आला आहे. वंचित व अन्य पक्षांच्या समावेशामुळे आघाडीला मजबुती मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

महाविकास आघाडीची बैठक आज ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत बरेचसे आणि अत्यंत सकारात्मक निर्णय झाले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीसह आप, शेकाप, सीपीआय, सपा आणि जनता दल युनायटेड या पक्षांना आघाडीत समाविष्ट करण्यात आले, असे खासदार राऊत यांनी सांगितले. या सर्व पक्षांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असून आघाडी मजबुतीने पुढे जात आहे असे ते म्हणाले.

आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत आणि जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी र्कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड, आमदार जितेंद्र आव्हाड व आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे, असे महाविकास आघाडीच्या वतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे. त्या पत्रावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शुक्रवारच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर येणार

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांना बैठकीबाहेर ठेवल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. ते वृत्त संजय राऊत यांनी यावेळी फेटाळून लावले. ते म्हणाले की, ‘वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीसाठी तीन नेते पाठवले होते. ते बैठकीला आल्यापासून आमच्यासोबतच होते. दुपारी आम्ही एकत्रच जेवण केले. आघाडीतील समावेशाचे पत्र त्यांना हवे होते तेसुद्धा त्यांना देण्यात आले. महाविकास आघाडीच्या पुढच्या 2 फेब्रुवारीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार आहेत.’