द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचे शिवाजी पार्कमध्ये सहा फुटांचे स्मृतिशिल्प

आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटू घडवणारे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर यांचे शिवाजी पार्क मैदानावर सहा फूट उंचीचे स्मृती स्मारक उभारण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवोदित क्रिकेटपटूंना प्रेरणा देणारे स्मृतिशिल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवाजी पार्क परिसरात आचरेकर सरांचे स्मारक उभारण्याची सूचना कामथ मेमोरिअल क्लबचे माजी कर्णधार सुनील रामचंद्रन यांनी राज्य सरकारकडे केली होती. या स्मृतिशिल्पाच्या उभारणीसाठी त्यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यावर राज्य सरकारने एक समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशीनंतर आचरेकर सरांचे स्मृतिशिल्प उभारण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने अखेर मंजुरी दिली आहे.