ठाण्यातील मतदार याद्यांमध्ये ‘गोंधळ मांडला’, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोगाचा बेफिकिरीचा ‘दांडिया’

प्रतिकात्मक फोटो

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात लाखो बोगस, दुबार नावे घुसडल्याचे डझनभर पुरावे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक आयोगाला दिले. मात्र यानंतर पडताळणीचे आदेश देणाऱ्या आयोगाने पुन्हा एकदा बेफिकिरीचा ‘दांडिया’ खेळल्याचे समोर आले आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात 16 हजार 760 मतदारांची नावे दुबार असल्याचे निदर्शनास आणूनदेखील केवळ 1 हजार 81 मतदारांची नावेच मतदार यादीतून वगळण्यात आल्याने ठाणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेमक्या कोणाच्या इशाऱ्यावरून मतदार याद्यांत हा ‘गोंधळ मांडला’ जात आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, मीरा-भाईंदर, बेलापूर, ऐरोली या विधानसभा मतदारसंघांत तब्बल 1 लाख 66 हजार 910 दुबार मतदार असल्याचे पुरावे शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यावेळी जिल्हा निवडणूक आयोग अधिकारी अशोक शिनगारे यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावी, असे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु दुबार नावांची आकडेवारी घटण्याऐवजी पुन्हा वाढल्याची तक्रार शिवसेना नेते राजन विचारे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

मात्र मतदार याद्यांमधील घोळ संपलेला नसल्याचे ठाणे शहर मतदारसंघातील मतदार यादीवरून उघड झाले आहे. या मतदारसंघात 16 हजार 760 मतदारांची नावे दुबार असल्याचे निदर्शनास आणूनदेखील केवळ 1 हजार 81 मतदारांची नावेच मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे दुबार नावांचा खेळ कोणाच्या सांगण्यावरून केला जात आहे, याचे विधानसभा निवडणुकीशी काही कनेक्शन तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

मतदार राजा मतदानासाठी घराबाहेर पडू नये म्हणून अनेक मतदारांची नावे भलत्याच विधानसभा मतदारसंघात घुसडवण्यात आली आहेत. त्याचेही पुरावे शिवसेनेने दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यांत तेल टाकून याकडे लक्ष द्यावे अन्यथा शिवसेना जोरदार आंदोलन छेडेल.

राजन विचारे, (शिवसेना नेते, माजी खासदार)

शिवसेनेच्या दणक्यानंतर अधिकारी घरोघरी

शिवसेनेच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाने घरोघरी जात मतदार याद्यांची तपासणी केली. मतदारांच्या छायाचित्रासह मतदारयादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदारांच्या घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत भेटी दिल्या असता एकाच यादीत दुबार नाव असल्याचे निदर्शनास आले आहे.