नशीब फळफळले!, लॉटरीआधीच लागली लॉटरी; उपलब्ध घरांच्या तुलनेत कमी अर्ज आल्याने सहा जणांचे घर पक्के

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीला अर्जदारांना तुफान प्रतिसाद मिळाला असून अर्जदारांचे डोळे आता 8 ऑक्टोबरला निघणाऱ्या घरांच्या लॉटरीकडे लागले आहे. यंदाच्या सोडतीत काही योजनांमध्ये एका घरासाठी शेकडो अर्ज आले तर काही ठिकाणी याउलट चित्र पाहायला मिळाले. सोडतीत उपलब्ध घरांच्या तुलनेत कमी अर्ज आल्यामुळे सहा अर्जदारांचे नशीब फळफळले असून लॉटरीआधीच ते विजेते ठरले आहेत. आता केवळ त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने काढलेल्या 2030 घरांच्या सोडतीसाठी 1,13,811 अर्जदार आले आहेत. त्याची प्रारूप यादी म्हाडाने शुक्रवारी जाहीर केली. यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील 359 घरांसाठी 47,134 जणांनी, तर अल्प उत्पन्न गटातील 627 घरांसाठी 48,762 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली.

मध्यम उत्पन्न गटातील 768 घरांकरिता 11,461 जणांनी, तर उच्च उत्पन्न गटातील 276 घरांसाठी 6454 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. शहरात काही ठिकाणी वेगवेगळ्या योजनेंतर्गत असलेल्या घरांची संख्या जास्त आणि त्या तुलनेत अर्ज कमी आले आहेत. त्यामुळे अनामत रकमेसह आलेल्या अर्जदार विजेते ठरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

शीवमधील घर धूळ खात पडणार

शीव येथील हेरिटेज अपार्टमेंट (392 बी) या योजनेत एक घर विक्रीसाठी असून त्याकरिता एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे तूर्तास तरी हे घर धूळ खात पडणार असून या घराचा पुढील लॉटरीत समावेश करावा लागणार आहे.

ताडदेव येथील कोट्यवधींच्या घरासाठी 42 अर्ज

म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर म्हणजे ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये आहे. उच्च उत्पन्न गटातील पाच घरांचा लॉटरीत समावेश असून त्याच्या किमती सहा ते साडेसात कोटी यादरम्यान आहेत. या पाच घरांसाठी तब्बल 42 इच्छुकांनी अर्ज केले आहेत.

अँटॉप हिल आनंद हाईट (459 अ) येथे 3 घरांसाठी केवळ 1 अर्ज आला आहे. भायखळा दूधवाला बिल्डिंग (462 अ) या योजनेत तसेच दूधवाला बिल्डिंग भायखळा (463 अ) या योजनेत प्रत्येकी एक घर असून त्यासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला आहे. दूधवाला बिल्डिंग भायखळा (464 अ) येथे 2 घरे असून त्यासाठी एकच अर्ज आला. वडाळा आनंद हाईट (465 अ) येथे 3 घरे असून त्याकरिता केवळ 1 अर्ज आला आहे. भायखळा बेलासीस (467 अ) येथे एका घरासाठी एकच अर्ज आला आहे.