गुजरातसाठी काम करणाऱ्यांना घरी बसवा, सय्यद नासीर हुसेन यांचे आवाहन

महाभ्रष्ट्र भाजपा सरकारच्या काळात गुजरातच्या ठेकेदारांना मोठमोठी कामे दिली गेली. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, हिरे उद्योग, बल्क ड्रग्ज पार्कसारखे महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पाठवून येथील रोजगार पळवले. दुसरीकडे, गुजरातमधून मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप भाजपा युती सरकारने केले, असा हल्लाबोल करत शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रासाठी नाही तर गुजरातसाठी काम करतेय. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्रासाठी काम करणाऱया महाविकास आघाडीलाच निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस वार्ंकग कमिटीचे सदस्य व विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ निरीक्षक खासदार सय्यद नासीर हुसेन यांनी केले.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत डॉ. नासीर हुसेन म्हणाले, भाजपा युती सरकार हे भ्रष्ट व घोटाळेबाज सरकार आहे. 40 टक्के कमिशनवाल्या या सरकारने 10 हजार कोटींचा जलयुक्त शिवार घोटाळा, 8 हजार कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा, 6 हजार कोटींचा मुंबईतील रस्ते घोटाळा असे अनेक घोटाळे या सरकारने केले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ज्या कंपन्यांनी मोठय़ा देणग्या दिल्या त्या कंपन्यांना महाराष्ट्रातील मोठय़ा प्रकल्पांचे काम दिले. अजित पवार, रवींद्र वायकर, अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घोटाळ्याचे आरोप केले व त्यांना भाजपात घेतल्यावर आता मात्र ते यावर काहीच बोलत नाहीत, यावर भाजपाने उत्तर दिले पाहिजे.

भाजपाने ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आमदार फोडून विरोधी पक्षांची सरकारे पाडली. ते जनतेला अजिबात आवडले नाही. कर्नाटकात जनतेने भाजपाला धडा शिकवत काँग्रेसचे बहुमताचे सरकार आणले. तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱया भाजपाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही डॉ. हुसेन यांनी दिला.