सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; एअर टर्ब्युलन्समुळे प्रवाशाचा मृत्यू तर, 30 जण जखमी

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाला एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली. यामुळे विमानातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. लंडनहून येणाऱ्या या विमानाचे बँकॉकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

सिंगापूर एअरलाइन्सच्या बोइंग 777-300 विमानाने लंडनहून सिंगापूरला उड्डाण केले होते. टेकऑफच्या दीड तासानंतर सुमारे 30 हजार फूट उंचीवरून उड्डाण करत असताना विमानाला एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. त्यामुळे विमान यंत्रणेत बिघाड झाला. तसेच विमानाला हादरे बसू लागेल. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला. तर 30 जण गंभीर जखमी झाले. विमानातील भयंकर परिस्थितीमुळे विमान बँकॉकच्या दिशेने वळवण्यात आले. यानंतर दुपारी पावणे चार वाजता बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या या फ्लाइटमध्ये 211 प्रवासी आणि 18 क्रू मेंबर्स होते. हे विमान सिंगापूरच्या चांगी विमानतळावर संध्याकाळी 6.10 वाजता उतरणार होते. मात्र, एअर टर्ब्युलन्समुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान उतरल्यानंतर लगेचच अनेक रुग्णवाहिकाही विमानतळावर पोहोचल्या. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सिंगापूर एअरलाइन्सने मृत प्रवाशाच्या कुटुंबियांकडे शोक व्यक्त केला आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचे एअरलाइन्सने म्हटले आहे. जखमींना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्वजण थायलंडमधील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत. एवढेच नाही तर आम्ही आमची एक टीम बँकॉकलाही पाठवत आहोत, असे सिंगापूर एअरलाइन्सने म्हटले आहे.