मिंधे सरकारचे थोबाड फुटले… भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळला राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा!

सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मान शरमेने खाली गेलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोट किल्याच्या परिसरात ताशी 45 कि.मी. वेगाने वाहणाऱया वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगत पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला खरा, पण राज्य सरकारने या पुतळा दुर्घटनेच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालामुळे मिंधे सरकारचे थोबाड फुटले आहे. राजकोट किल्ल्यावरील उभारण्यात आलेल्या 35 फूट उंचीच्या पुतळ्याचे डिझाईनच चुकीच्या पद्धतीने करण्यात आले होते. देखभालीअभावी लागलेला गंज, चुकीचे वेल्डिंग आणि कमपुवत फ्रेममुळे पुतळा कोसळल्याचा ठपका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने ठेवला आहे. राजकोट येथील पुतळा वाऱयाच्या वेगामुळे नाही तर मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱयामुळे कोसळल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्ग जिह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली होती. अखेर राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती नेमली होती. या समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना 16 पानी अहवाल सादर केला आहे. दरम्यानच्या काळात या पुतळय़ाचा शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली.

समितीमध्ये कोण होते?

भारतीय नौदलाचे कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, याच विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटी मुंबईचे प्रा. जांगिडा व प्रा. परिदा यांचा समावेश होता.

– पुतळा दुर्घटनेनंतर पुतळा घडविणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि सदर काम देण्यात आलेला कंत्राटदार चेतन पाटील यांना अटक झाली आहे.

अहवालात काय?

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा हा गंज आणि कमकुवत फ्रेममुळे कोसळल्याचे चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. 35 फूट पुतळय़ाचे वजन पेलू शकेल एवढी या पुतळ्याची फ्रेम मजबूत नव्हती, असेही अहवालात म्हटले आहे.

ठपका काय ठेवला?

शिवरायांचा पुतळा उभारल्यावर त्याची योग्य प्रकारे देखभाल ठेवण्यात आली नाही. देखभालीअभावी पुतळय़ाला अल्पावधीतच अनेक ठिकाणी गंज लागला होता. चुकीच्या पद्धतीने या पुतळय़ाचे वेल्डिंग करण्यात आले होते. पुतळय़ाचे डिझाईन योग्य पद्धतीने करण्यात आलेले नव्हते, असा ठपकाही समितीने ठेवला.

आठच महिन्यांत पुतळा कोसळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळय़ाचे अनावरण केले होते, मात्र आठच महिन्यांत 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली.

चार दिवसांत भ्रष्टाचाराचे पुरावे द्या; वैभव नाईक यांना पोलिसांची नोटीस

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला होता. या पार्शवभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांनी आमदार वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. यासंदर्भातील पुरावे चार दिवसांत सादर करून तपासकामी सहकार्य करण्याची विनंती पोलिसांनी त्यांना केली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा कितीही नोटिसा आल्या तरी त्या आम्ही घेऊ असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

अखेर सरकारची कबुली

पुतळय़ाचे बांधकाम सदोष पद्धतीने झाल्याचे मंत्री उदय सामंत यांनी मान्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही. त्यामुळे पुतळय़ाला आतून गंज चढला होता. पुतळय़ाचे डिझाईन व वेल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी चुका होत्या. चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.