Sindhudurg News – देवगड तालुक्यातील युवा चित्रकार अक्षय अरुण मेस्त्री ‘समाज भूषण पुरस्कारा’ने सन्मानित

विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा समाज भूषण पुरस्कार देवगड तालुक्यातील गवाणे येथील उद्ययमुख युवा चित्रकार अक्षय अश्विनी अरुण मेस्त्री याला देण्यात आला.

अक्षय मेस्त्री यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम ठवली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत जखमी प्राणी व पक्ष्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडणे, अशा सामाजीक कामांसोबत त्यांनी निसर्ग संवर्धनाची सुद्धा कामे हाती घेतली आहे. त्यांच्या या जनजागृती कार्याचा गौरव म्हणून विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्ष दिल्या जाणाऱ्या “समाज भूषण” पुरस्काराकरिता अक्षय मेस्त्री यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे अक्षय मेस्त्री यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट ही गेल्या दहा वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. फाउंडेशनच्या दशकपूर्ती वर्धापन दिनानिमित्त यावर्षी दहा सन्मानिय व्यक्तींची निवड करण्यात आली होती. संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच त्या त्या क्षेत्रात विशेष, उल्लेखनीय, समाजास भूषणावह परंतु प्रसिद्धी परामुख कार्य करणाऱ्या अश्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात येतो. संस्थेचे अध्यक्ष विवेकानंद सुतार तसेच बी.एम.सी.सी कॉलेज पुणेचे प्रा.डॉ.प्रशांत साठे या प्रमुख अतिथींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.