कुणाला खेळवायचं अन् कुणाला बसवायचं ?, पुणे कसोटीसाठी गिल फिट झाल्याने संघनिवड समितीपुढे टेन्शन

मान मुरगळल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास मुकलेला शुभमन गिल आता फिट झालाय, मात्र त्याच्यासाठी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पुणे कसोटीसाठी ‘टीम इंडिया’तून डच्चू द्यायचा कोणाला? असा यक्षप्रश्न हिंदुस्थानच्या संघनिवड समितीपुढे उभा ठाकला आहे. गिलला दुसऱ्या कसोटीत खेळवायचं असेल तर लोकेश राहुल, यशस्वी जैसवाल किंवा सरफराज खान यापैकी एकाला बाहेर बसवावं लागणार आहे, मात्र गिलला खेळवायचं असेल तर कोणाला बसवायचं, याचं जबरदस्त टेन्शन संघनिवड समितीपुढे उभं टाकलं आहे.

हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा कसोटी सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर रंगणार आहे. बंगळुरूतील पहिल्या कसोटीत शुभमन गिलच्या जागेवर सरफराज खानला संधी देण्यात आली होती. या जिगरबाज खेळाडूने मिळालेल्या संधीचं सोनं करताना झुंजार दीडशतकी खेळी केली होती, मात्र आता गिलही पूर्णतः फिट झाल्याची माहिती टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डॉशहट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

याचबरोबर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना लोकेश राहुलच्या फॉर्मबद्दल अजिबात चिंता नसून, ते राहुलला संजू सॅमसनप्रमाणे प्रदीर्घ काळ संधी देण्याच्या मूडमध्ये आहेत, असेही डॉशहट यांनी सांगितले. त्यामुळे गिलसाठी सरफराजचा बळी द्यायचा, राहुलला बाकावर बसवायचे की यशस्वी जैसवालच्या जागेवर त्याला सलामीला खेळवायचे? याबाबत संघनिवड समितीला मोठे विचारमंथन करावे लागणार आहे.

…तर सरफराजवर अन्याय ठरेल!

शुभमन गिलला दुखापत झाल्याने बंगळुरूतील पहिल्या कसोटीत त्याच्या जागेवर सरफराज खानला खेळविण्यात आले होते. या मुंबईकर फलंदाजाने 150 धावांची झुंजार खेळी करीत न्यूझीलंडची गोलंदाजी निप्रभ ठरविली होती. त्यामुळे गिलच्या पुनरागमनासाठी सरफराजचा बळी दिल्यास तो त्याच्यावर अन्याय ठरेल. याउलट लोकेश राहुलला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नव्हता, तर दुसऱ्या डावातही मोक्याच्या वेळी तो 12 धावांवर बाद झाला.

मात्र, त्याला प्रशिक्षक गौतम गंभीर यांचाच भक्कम पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत संघनिवड समितीची सलामीवीर यशस्वी जैस्वालवर वक्रदृष्टी होऊ शकते. कारण बंगळुरू कसोटीत जैस्वालने पहिल्या डावात 13, तर दुसऱ्या डावात 35 धावा केल्या होत्या, मात्र न्यूझीलंडआधीच्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत गिल व जैस्वाल यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे गिलला खेळवायचे असेल तर संघनिवड समितीला सरफराज, राहुल किंवा जैस्वाल यांच्यापैकी एकाचा बळी द्यावा लागणार आहे.

ऋषभ पंतही झाला फिट

बंगळुरू कसोटीत गुडघ्याला चेंडू लागून जायबंदी झालेला यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्यासह शुभमन गिल आता पूर्णतः फिट झाल्याची माहिती टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डॉशहट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘जायबंदी झाल्यानंतर पंतने यष्टिरक्षण केले नसले तरी दुसऱ्या डावात 99 धावांची उपयुक्त फलंदाजी केली होती. आता त्याचा गुडघा थोडाच दुखतोय. मात्र, पंतला विश्रांती दिली, तर लोकेश राहुल हा यष्टिरक्षणासाठी पर्याय असेल. मात्र पुण्याची खेळपट्टी बघता, रेग्युलर यष्टिरक्षकाला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता असल्याने पंत न खेळल्यास ध्रुक जुरेलवर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपविली जाईल.