हरेगाव चार दलित तरुणांना मारहाण प्रकरण, मुख्य आरोपींसह तिघांना अटक

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार दलित तरुणांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. दरम्यान, आरोपींना जेरबंद करण्यासाठी उद्या (मंगळवारी) पुकारण्यात आलेला सर्वपक्षीय ‘श्रीरामपूर बंद’ मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील थोरात यांनी दिली.

मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडे (वय 38, रा. उंदीरगाव, श्रीरामपूर), तसेच त्याचे साथीदार मनोज वसंत बोडखे (वय 44, रा. उंदीरगाव), दीपक दगडू गायकवाड (वय 45, रा. हरेगाव) यांना नाशिक व पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांना पुढील तपासकामी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील कुणाल देवीदास मगर, शुभम विजय माघाडे, ओम अशोक गायकवाड, प्रणय अरविंद खंडागळे यांना शेळी आणि कबूतरे चोरल्याच्या संशयातून आरोपी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, राजेंद्र अशोक पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे (सर्व रा. हरेगाव) यांनी हात-पाय बांधून झाडाला उलटे टांगून शुक्रवारी मारहाण केली होती. गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस पथकाने मुख्य आरोपी युवराज गलांडे, त्याचे साथीदार मनोज बोडखे, दीपक गायकवाड यांना नाशिक व पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांना श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे, निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सोपान गोरे, तुषार धाकराव, मनोहर गोसावी, विजयकुमार वेठेकर, बापूसाहेब फोलाने, अतुल लोटके, दत्तात्रय हिंगडे, विशाल दळवी, विशाल गवांदे, रवींद्र कर्डिले, मेघराज कोल्हे, सागर ससाणे, भीमराज खर्से, संदीप दरंदले, रवींद्र घुंगासे, संभाजी कोतकर, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नगरमध्ये रिपब्लिकनचा ‘रास्ता रोको’

हरेगाव येथील दलित युवकांना हात-पाय बांधून झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने नगरमधील मार्केटयार्ड चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाइंचे रोहित आव्हाड, शहराध्यक्ष हरीश अल्हाट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारला राज्यात वर्णव्यवस्था आणायची आहे काय? काँग्रेसचा सवाल

‘श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित तरुणांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? राज्य सरकारला राज्यात वर्णव्यवस्था आणायची आहे का?’ असे सवाल करीत, ‘काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही. दलित, वंचितांच्या हक्कांसाठी काँग्रेस धर्मांध राज्य शासनाच्या विरोधात लढत राहील,’ असा इशारा आमदार डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. ‘मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो, असे राऊत म्हणाले.