प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरी झालेल्या 45 लाख रुपयांच्या चोरीचा तपास लावण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. डॉ. ब्रह्मे यांच्याकडे काम करणाऱया महिलेनेच चोरीचे षङ्यंत्र रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या महिलेसह कन्नड येथील तिघा आरोपींचा चोरीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अटक केलेल्या दोघा आरोपींकडून 22 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
रशीद शेख (रा. कन्नड), वहिना राजू सय्यद (रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कन्नड येथील अन्य दोन आरोपी पसार झाले आहेत.
श्रीरामपूर शहरातील डॉ. प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरी 30 ऑक्टोबर 2023 पहाटे चोरी झाली होती. घरातील 40 लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. फिर्यादीत सात लाख रुपये किमतीचा सोन्याचा हारही चोरीस गेल्याची नोंद आहे. या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सीसीटीव्ही फुटेजवरूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे बराच काळ तपास रेंगाळला होता. चोरीची पद्धत पाहता कोणीतरी टीप दिल्याचा संशय पोलिसांना होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तपास करीत होती. अखेर या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांच्यासह दोन पथकांनी हा तपास लावला. या घटनेत चार आरोपी निष्पन्न झाले असून, त्यातील दोघे श्रीरामपूर येथील आहेत.
डॉ. ब्रह्मे यांच्या घरी काम करणारी महिला हिना आणि तिचा भाऊ या चोरीच्या कटात सहभागी होते. पसार झालेले इतर दोघे छत्रपती संभाजीनगर जिह्यातील कन्नड येथील आहेत.
शहरातील कॅनॉलच्या कडेला काळाराम मंदिराशेजारी ब्रह्मे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वर डॉ. प्रफुल्ल यांचे घर आहे. चोरी झाली तेव्हा डॉक्टरांची पत्नी आणि मुलगी धारवाड येथे गेल्या होत्या. मुलगा चिन्मय बाहेरगावी गेला होता. 30 ऑक्टोबरला पहाटे चिन्मय परत आले. ते झोपी गेल्यानंतर तीन चोरटय़ांनी लोखंडी शिडी लावून घरात प्रवेश केला. डॉ. चिन्मय ब्रम्हे यांच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि चोरटे डॉ. प्रफुल्ल झोपलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी डॉ. ब्रह्मे यांचे तोंड हाताने दाबले. दोघांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांना खिडकीला लटकवले. कटावणीने कपाट उघडून रोकड आणि दागिने लुटले. चोरटे गेल्यानंतर डॉक्टरांनी स्वतःची सुटका करत चोरीची माहिती मित्र आणि पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.