वाचा आई श्रीअंबाबाई आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीची ही रंजक कथा, दरवर्षी ललित पंचमीला साकारली जाते आकर्षक पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी ललित पंचमी निमित्त करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीची हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाताना आकर्षक पुजा साकारण्यात आली.

देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते.देवी त्र्यंबोलीने (टेंबलाई ) आपल्या चतुराईने कामाक्षा कडील योग दंड काढून घेऊन देवांना पूर्ववत केले व कामाक्षा बरोबर युद्ध करुन त्याचा वध केला. त्या विजया प्रित्यर्थ श्रीअंबाबाईने विजय सोहळा आयोजित केला. या सोहळ्याचे त्र्यंबोली देवीला आमंत्रण द्यायचे राहून गेले.त्यामुळे सखी देवी त्र्यंबोली रुसुन पुर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. अंबाबाईच्या हे लक्षात आल्यावर ती त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी ललिता पंचमी दिवशी तिला भेटायला गेली व तिचा रुसवा काढून दोघींची हृद्य भेट झाली.

पंचमीला वाजत गाजत जाते श्री अंबाबाईची पालखी

सकाळी तोफेच्या सलामी नंतर साडे नऊच्या सुमारास करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची उत्सव मूर्ती फुलांनी सजवलेल्या पालखीतून भालदार,चोपदार अशा लवाजम्यासह श्रीअंबाबाई मंदिरातून श्रीत्र्यंबोली मंदिराच्या दिशेने रवाना झाली.पारंपारिक पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तसेच ठीक ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या‌. मार्गात सुवासिनींकडून पालखीचे औक्षण व पूजन केले जात होते.त्यासाठी छत्रपती शाहू मिल तसेच टाकळा खण येथे काही क्षण पालखीचा विसावा ठेवण्यात आला होता.

पारंपारिक लवाव्याजम्यासह दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीत्र्यंबोली मंदिरात श्रीअंबाबाईची पालखी दाखल होताच,छत्रपती घराण्यातील युवराज संभाजीराजे छत्रपती,महाराजकूमार मालोजीराजे छत्रपती,शहाजीराजे छत्रपती आणि यशराजे छत्रपती या शाही परिवाराच्या उपस्थितीत गुरव समाजातील सागरीका गुरव या कुमारीकेच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी झाला. यावेळी कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. दोन्ही देवींच्या भेटीचा विधी संपन्न झाल्यानंतर श्रीअंबाबाईची पालखी पुन्हा आपल्या मंदिराकडे मार्गस्थ झाली.