धक्कादायक! मोदी सरकारचे दावे फोल!! देशात बेरोजगारी वाढली, पगार घटले

2047 पर्यंत हिंदुस्थान विकसित देशांच्या पंक्तीत असेल. येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्यात केला, परंतु वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. 2023 मध्ये देशात नव्या नोकऱ्यांचे प्रमाण घटले असून बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे. तर नोकरदारांच्या पगारातही घट झाल्याचे एका अहवालावरून समोर आले आहे. त्यामुळे मोदी सरकार उघडे पडले आहे. सरकारचे दावे फोल ठरले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात नव्या नोकऱ्यांचे प्रमाण तब्बल 17.5 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे यंदा केवळ 6.6 दशलक्ष इतक्याच नव्या नोकऱया निर्माण झाल्याचे ‘फ्रंटलाइन वर्कफोर्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म बेटरप्लेस’ने तयार केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून उघड झाले आहे.

गेल्या आर्थिक वर्षात 8.8 दशलक्ष नव्या नोकऱया निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. ई-कॉमर्स, लॉजिस्टीक आणि मोबिलीटी या क्षेत्राची आकडेवारी बेटरप्लेसकडे आली. एप्रिल 22 ते मार्च 23 या दरम्यानच्या आकडेवारीवरून बेटरप्लेसने सोमवारी देशात बेरोजगारीचे वास्तव दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला.

देशातील 25 वर्षांखालील तरुण पदवीधरांपैकी 42 टक्के बेरोजगार असल्याचा अहवाल नुकताच अझीझ प्रेमजी विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता.

हिंदुस्थानातील बेरोजगारीचा दर मार्च 2023 मध्येच झपाटय़ाने वाढत गेला. तो एप्रिलमध्येच तब्बल तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याचे ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालातून समोर आले होते.

कामगारांच्या सरासरी मासिक पगारात घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये असलेल्या 22,800 रुपये पगारात 2023 मध्ये 21,700 पर्यंत घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

या क्षेत्रातील नोकऱया घटल्या

सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, कॉल सेंटर कर्मचारी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, साफसफाई आणि इतर नोकऱ्यांवर परिणाम झाला. अमेरिकेतील मंदीचा आयटी क्षेत्राला फटका बसला. बेटरप्लेसच्या अहवालानुसार ई-कॉमर्सच्या मागणीतही 52 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे.