गाईला वाचवताना बस उलटली; 1 ठार, 28 जखमी

रस्ता ओलांडणाऱ्या गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस उलटल्याची घटना आज सकाळी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ जवळ घडली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 28 प्रवासी जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही शिवशाही बस नागपूरहून अकोल्याकडे जात होती. नांदगावपेठ जवळ अचानक गाय रस्त्यावर आली. गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसची गाईला धडक बसली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपघातात बसच्या काचा फुटल्या, बसचे बरेच नुकसान झाले. घटनेबाबत कळताच परिसरातील नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. नांदगावपेठ पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. आपत्कालीन दरवाजातून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.