युवा सेना सुरू करणार शाळा–कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन, सिनेटवरील शतप्रतिशत विजयाचा ‘मातोश्री’वर जल्लोष

मातोश्रीवर सिनेट निवडणुकीचा जल्लोष करताना जय भवानी, जय शिवाजी’,

शिवसेना झिंदाबाद’, ‘आवाज कुणाचा, युवा सेनेचा’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो,

हम तुम्हारे साथ हैअशा गगनभेदी घोषणांनी अवघा वांद्रे परिसर दुमदुमून गेला.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेने मिंधे-भाजपला जोरदार झटका देत सर्वच्या सर्व दहा जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज ‘मातोश्री’वर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी विजेत्या शिलेदारांचे कौतुक करीत गुलाल उधळला.  यावेळी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून 24 तास उपलब्ध असणारी ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. या हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबई विद्यापीठाच्या दहा पदवीधर नोंदणीकृत सिनेटची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेने विजयी परंपरा कायम राखली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीत मध्यरात्री 1 वाजता युवा सेनेने अखेरची दहावी जागा जिंकत मुंबई विद्यापीठावर पुन्हा एकदा निष्ठावंत युवा सेनेचा भगवा फडकवला. या विजयानंतर आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जल्लोष करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवार प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अॅड. अल्पेश भोईर, परमात्मा यादव, किसन सावंत, शशिकांत झोरे, धनराज कोहचाडे, शीतल शेठ-देवरूखकर, स्नेहा गवळी, मयूर पांचाळ यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निष्ठावंत माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांचा ठाकरे कुटुंबीयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 विजयाचा गुलाला उधळला

‘मातोश्री’वर सिनेट विजयाचा जल्लोष करण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवसैनिक दाखल झाले होते. डोक्यावर भगवी टोपी, खांद्यावर भगवे उपरणे आणि तेजस्वी डौलदार भगवा फडकवत त्यांनी विजयाचा गुलाल उधळला.

सिनेट निवडणुकीत मिळालेला विजय ही विजयाची सुरुवात आहे. युवा सेनेने खऱ्या अर्थाने करून दाखवलंअसून निवडणूक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या घाबरट मिंध्यांना यामुळे इशाराच मिळाला आहे. आता विधानसभा निवडणुकीत असाच गुलाल उधळायचा आहे. – आदित्य ठाकरे, युवा सेनाप्रमुख