मिंधे सरकार महापालिका कर्मचाऱ्यांचा पगारही कंत्राटदार मित्रांच्या घशात घालतील; वेतन विलंबावर आदित्य ठाकरे संतापले

राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील स्थिती बिकट असतानाही मिंधे सरकार जाहिरातबाजी आणि कंत्राटदार मित्रांवर पैशांची उधळपट्टी करत आहे. मुंबईच्या जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासाठीही सरकारकडे पैसे नसल्याने वेतनविलंब होत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतन विलंबाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजप-मिंधेंचं अर्थकारण – होऊ दे खर्च! कंत्राटदार मित्र आणि स्वतःसाठी खोके, दिवसरात्र मुंबईची सेवा करणाऱ्यांना मात्र धोके! महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतन विलंब! कंत्राटदार मित्रांवर उधळपट्टी करणाऱ्यांविरोधात गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने आवाज उठवतोय. आता तर सणवारी आपण पाहतोय की वेळेत वेतन देण्यासाठीही महानगरपालिकेकडे रक्कम नाहीये. पण दुसऱ्या बाजूला रस्ता घोटाळ्यात कंत्राटदारांना 4% अधिक रक्कम द्यायला महानगरपालिका तयार आहे! ॲडव्हान्स मोबिलायझेशन द्यायलाही तयार आहे! हा निर्दयी निर्णय आम्ही उलटवणारच! मुंबईचे खरे सेवेकरी (खरंतर मित्र, जे दिवसरात्र राबतात) त्यांना पगार 1 तारखेलाच मिळणार! मिंधे सरकार अजून राहिलं तर ते हा पगारही कंत्राटदार मित्रांच्या घश्यात घालतील!, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मिध्यांवर हल्ला चढवला.