कल्याणमध्ये गद्दारीला थारा नाही; निष्ठावंत सचिन बासरे यांची मशाल तळपणार

कल्याण पश्चिम विधानसभेत महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सचिन बासरे आणि शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर अशी दुरंगी लढत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमध्ये आजही गद्दारीला थारा दिला जात नाही. कल्याणची दुर्गाडी देवी म्हणजे लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान. त्यामुळे दुर्गाडी देवीच्या साक्षीने कल्याणकर मतदार शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या आमदार विश्वनाथ भोईर यांना यावेळी घरी बसवतील असा विश्वास व्यक्त होत आहे. असेच वातावरण आहे. याचवेळी कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख कृतीतून जपणारे शहरप्रमुख सचिन बासरे यांची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली आहे. त्यामुळे बासरे यांचे निवडणूक चिन्ह असणारी ‘मशाल’ तळपणार आणि बासरे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशीच कल्याणची हवा आहे.

कल्याण मतदारसंघ शिवसेनेचा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी विचारांचा बालेकिल्ला. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विश्वनाथ भोईर जिंकून आले. मात्र 2022 मध्ये गद्दारी करून सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या खोके सरकारसोबत भोईर गेले. त्यांची ही कृती कल्याणकरांना पटली नाही. विशेष म्हणजे भोईर आमदार असूनही त्यांच्यासोबत संघटनेतील एकही निष्ठावंत पदाधिकारी आणि शिवसैनिक गेला नाही. मोठ्या हिमतीने शिवसैनिकांनी आम्ही मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांचे पाईक असल्याचे अभिमानाने सांगितले. कल्याणला लागलेला गद्दारीचा डाग पुसून ‘ऐतिहासिक कल्याण’ ही मूळ ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष सचिन वासरे यांना विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

पाच वर्षांत प्रश्न सुटण्याऐवजी अधिक वाढले
कल्याणकर पाणी समस्या आणि वाहतूककोंडीने बेजार आहेत. गेल्या पाच वर्षांत ही साधी समस्याही विश्वनाथ भोईर यांना सोडवता आली नाही. रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरातून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच आहे. कल्याण शहर आणि मांडा, टिटवाळावासीयांना मुबलक पाणीही मिळत नाही. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात विद्यार्थ्यांना काहीच लाभ मिळत नाही. मूलभूत प्रश्नही मार्गी लावण्यात अपयश आल्याने कल्याणकर पुन्हा विश्वनाथ भोईर यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत.

यासाठी शिवसेना वचनबद्ध
वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी सोल्युशन, कल्याण रेल्वे टर्मिनस, कल्याण पश्चिम मतदारसंघातील सर्व प्रभाग आणि गावांना मुबलक पाणी मिळावे यासाठी पालिकेचे स्वतःच्या मालकीचे धरण, मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे आणि कल्याण स्वतंत्र जिल्हा या गोष्टीसाठी विधानसभेत आवाज उठवून ते मार्गी लावण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सचिन बासरे यांनी ठामपणे सांगितले.

शिवसेना-मातोश्री कल्याण अभिमानाचे समीकरण
शिवसेना, मातोश्री आणि कल्याण हे पूर्वीपासूनच अभिमानाचे समीकरण राहिले आहे, ते आजतागायत कायम आहे. त्याचमुळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राज्यातील नव्हे तर देशातील पहिले स्मारक बनविण्याचा मान कल्याण- डोंबिवलीला मिळाला. भगवा तलावाच्या काठावर त्यांचे भव्य स्मारक साकारले आहे. दुर्गाडी आणि भगवा तलावाचे वैभव जपण्यासाठी शिवसैनिकांची कायमच बांधिलकी राहिली आहे. आता यापुढे शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन कल्याणकरांचे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपले प्राधान्य राहील अशी ग्वाही सचिन बासरे यांनी दिली आहे.