महाराष्ट्रद्वेष्टय़ा भाजपला नडणार म्हणजे नडणारच; आदित्य ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून येथील लाखो तरुणांचा रोजगार हिरावणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्टय़ा भारतीय जनता पक्षाला नडणार म्हणजे नडणारच, असा इशारा शिवसेना नेतेयुवासेना प्रमुखआमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला. तरुणांनो, माझ्यासोबत लढायला उभे राहणार आहात का, असे त्यांनी विचारताच तरुणाईने शिवसेनेचा गगनभेदी जयघोष केला.

मुंबई देशाची आर्थिक शक्ती, भाजपला हेच बदलायचंय

मुंबईचे महत्त्व भाजपला कमी करायचे आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केलीते म्हणाले की, ‘मुंबई ही देशाची आर्थिक शक्ती आहे, आणि भाजपला हेच बदलायचे आहे. अडीच वर्षांत मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. हलक्या पावसात रस्त्याची कामे सुरू आहेत आणि आम्ही केलेले काम लोकांसमोर आहे. मुंबईला आजचा सर्वात मोठा धोका पर्यावरणापासून, क्लायमॅट बदलातून झाला आहे, तसेच तो तानाशहापसूनही आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

 दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी गोल देऊळ तसेच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी लोखंडवाला येथे सभा संपन्न झाली. दोन्ही सभांना आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले.

साऊथ से साफ और नॉर्थ से हाफ झालेली भाजपा आता चीनमधून 400 पार करणार की चंद्रावरून? अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली.

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणाऱ्या भारतीय जनता पक्षावर यावेळी सडपून टीका केली. ते म्हणाले की, महिलांना विचारतोय, तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का? नाही वाटत… कारण भाजपा सरकार सत्तेवर आहे. हजारो महिलांवर बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार करताहेत. अशा भाजपला मतदान करणार का? मिंधे सरकारमधील मंत्री महिलांना शिवीगाळ करतात, त्या मिंधे सरकारच्या उमेदवारांना मतदान करणार का? बिल्कीस बानोच्या अत्याचाऱ्यांचा सत्कार करणाऱ्या भाजपला मतदान करणार का? असे सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यावर उपस्थित महिलांनी अत्याचारी भाजपला तडीपार करणार असा निर्धार व्यक्त करत जोरदार घोषणा दिल्या. दक्षिण मध्य मुंबईतही एक ‘रेवण्णा’ आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी महायुतीचे राहुल शेवाळे यांचा वेध घेतला.

आज आपण काय केले आणि भविष्यात काय करणार आहोत याची चर्चाच होत नाही. दोनदा निवडून देऊन भाजपा आम्हाला विसरली. आणि सरकारचे काम देश चालवणे, पण पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांच्या मागे लागलेत. भाजपला पराभूत करण्याची वेळ आली की ते हिंदू मुस्लिमांच्या मागे लागतात, असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की ‘20 मे रोजी निवडणुका आहेत, पृपया सगळ्यांनी मतदान करा, या निवडणुकीला दोन महिने लागलेत, त्यामुळे लोक गावोगावी रजेवर जात आहेत. मात्र तरीही लोकांमधे उत्साह कायम आहे. कारण हा लढा संविधानाच्या रक्षणाचा आहे’.

यावेळी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते राजपुमार बाफना, खासदार प्रियांका चतुर्वेदी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजस्थानचे वैभव गहलोत, काँग्रेस आमदार आमिन पटेल, राष्ट्रवादीचे नरेंद्र बर्वे, काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा, शिवसेना विभाग संघटक राजूल पटेल, अरुण दुधवडकर, हिराबाई देवासे, नसीम सिध्दीकी, हुस्नबानू खलिफे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

भाजप तडीपार होत चालली आहे. भाजपवाले पुढच्या चारपाच दिवसात कमल का फूल घेऊन येतील. तुमचे मत फुकट जाणार आहे असे सांगतील. त्यांना विचारा तुमचे 400 पार कसे होणार?