25 लाखांचे पेन, 15 लाखांचा सूट तरीही गरीबीचे ढोंग, संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना साधेपणाने जगा, सामान्य माणसांमध्ये जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका असे आवाहन केले होते. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले जे.पी नड्डा यांचा हा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू होतो. नरेंद्र मोदी यांच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे, मोदींच्या हातातील घड्याळाची किंमत काढा, मोंदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा, मोदी ज्या विमानातून फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेले 20 हजार कोंटींचे विमान, मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधिश कोणी गरीब नाही. त्यामध्ये चहा विकणारा कोणी नाही  त्यामुळे जे.पी. नड्डा यांनी हे ढोंग बंद केले पाहिजे. भाजपने निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी बंद करावी अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी मुंबई दौऱ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना साधेपणाने जगा, 50 लाखांचे घड्याळ वापरु नका, महागड्या गाड्यांमधून फिरु नका असे आवाहन केले आहे. सामान्य माणसांमध्ये जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका. म्हणजे मोदी करतात तसे गरीबीचे ढोंग करा. शंभर टक्के भाजपच्या नेत्यांच्या हातात महागडी घड्याळे आहेत. 90टक्के भाजपचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्या घेऊन फिरतात. तुम्ही एका बाजूने शेतकरी आंदोलकांवर गोळ्या झाडता, शेतकऱ्यांच्या हत्या करता, या महाराष्ट्रामध्ये गरीबीची थट्टा उडवता, आमदार, खासदारांना 50-50 कोटींना विकत घेऊन सरकारं बनवता आणि तुम्ही दुसऱ्या बाजुला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरु नका, महागडी घड्याळं वापरु नका. जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाचे फोटो आणि व्हिडीओ काढा आणि लोकांना दाखवा. म्हणजे कोण कशी महागडी घड्याळं वापरतायतं ते कळेल. घड्याळ वापरणे हा गुन्हा नाही कदाचित त्यांना भिती वाटत असेल घडाळ्यांची आणि म्हणून त्यांनी शरद पवारांचे घड्याळ काढून घेतले असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून लबाडी करण्यात येते हे चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुमचे एवढे वस्त्रहरण करुन सुद्धा तुमचा खोटारडेपणा, तुमच्या चोऱ्या लांड्यालबाड्या निवडणुकीतल्या उघड करुनसुद्धा तुम्ही 370 पार वगैरे ज्या घोषणा करताय ही लोकशाहीची थट्टा आहे. याचा अर्थ तुम्ही 370 जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतलेली आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

असा श्रीमंतीचा थाट आहे गेल्या 70 वर्षांमध्ये कोणत्या प्रधान मंत्र्यांनी उपभोगला नव्हता

वेळ आणि शाही याच्यावर निवडणुकीत जनता काय धडा शिकवू शकते? या प्रश्नावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या जनतेने ठरवले आहे. यांचे महागडे सूट उतरवायचे, यांची महागडी घड्याळं भंगारात टाकायची आणि ही जी शाही आहे ती फक्त लोकशाही राहिल आणि हुकूमशाही जाईल. ही शाही आम्हाला माहित आहे. या महाराष्ट्रात अशांतता, सामाजिक अस्वस्थता, राजकीय झुंडशाही जी सुरु आहे याच्यावरती नड्डा यांना महाराष्ट्रातून बोलावेसे वाटले नाही? इकडचे त्यांचे जे सरकार आहे ते ज्याप्रकारे महाराष्ट्राची लूट करतय, दरोडे टाकतंय त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावसं वाटलं नाही?. नड्डांनी जे मत व्यक्त केलेले आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांना लागू होते. देशातील प्रधानमंत्र्यांचा जो श्रीमंतीचा थाट आहे तो गेल्या 70 वर्षांमध्ये कोणत्या प्रधान मंत्र्यांनी उपभोगला नव्हता. फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशांवर. इलेक्ट्रोल बॉण्ड सात हजार कोटींचा घोटाळा ही सगळ्यात मोठी या देशातील लूट आहे. जेपी नड्डा यावर काही बोललेत? नाही.पीएम केअर फंडामध्ये जगभरातल्या भ्रष्टाचाऱ्यांनी लाखो कोटी रुपये टाकले आहेत. नड्डा त्यावरती काही बोलतायत? नाही. हा महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. हा महाराष्ट्र नेहमी सामान्य राहिलेला आहे आणि सामान्य माणसाने मोठा विचार करुन हा महाराष्ट्र घडवलेला आहे. छत्रपची शिवाजी महाराजांनी सुद्धा या मातीतले राजकारण केले आहे. खोक्याचे राजकारण कधी केले नाही असाही हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला.

आमचा बाप हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत,तुमच्या भाजपच्या बापाचा पत्ता आहे का?

 देवेंद्र फडणवीस म्हणतात बापाचा बाप आला तरी मुंबई विदर्भापासून वेगळी केली जाणार नाही यावर संजय राऊत म्हणाले, तुमचा बाप आला तरी हे होणार नाही. आमचा बाप सोडून द्या, आमचा बाप हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत,तुमच्या भाजपच्या बापाचा पत्ता आहे का? तुम्हाला आता दहा बाप झाले. अजित पवार गट, मिंधे गट, अमूक गट हे तुमचे बाप आहेत सगळे. तुमचे काय आहे? भाजपला खरा बाप असता तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं. शिवसेना बाळासाहेब ठाकरे ही एकाच बापाची आहे. हे आम्ही परखडपणे सांगतो आणि म्हणून आम्ही ताठ मानेने निर्भयपणे लोकांसमोर जातो, तोंड लपवून जात नाही. आमच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांचे भाषण सुरु असताना लोकं बिर्याणी खायला निघून जात नाहीत. हे भाडोत्री घेऊन तुम्हाला हे राज्य चालवता येणार नाही अशी सडकून टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

जे.पी.नड्डा यांनी कानकोरणं आणून द्यावं

बुधवारी बहुतेक शंभू सीमेवर जो गोळीबार झाला तो बहुदा त्या गो्ळीबाराचा आवाज आणि त्या शेतकऱ्यांच्या किंकाळ्या, आक्रोश नड्डांच्या कानापर्यंत जर गेले नसतील. तर त्यांना महाराष्ट्रातल्या भाजपने कानकोरणं कान साफ करायला आणून द्यावं. कोण ते शेलार बिलार जी लोकं आहेत ना चौपाटीवर कान साफ करणारी लोकं भेटतात आमच्याकडे . बसतात ते कान साफ करुन देतात. ते करुन घ्यावे. एका शेतकऱ्याच्या डोक्यात गोळी मारली. शेकडो शेतकरी जखमी आहेत. काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी. मीनीमम सपोर्ट प्राईजसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे आणि तुम्ही आम्हाला इकडे येऊन काय प्रवचनं जोडतायतं?

ब्रिटीशांच्या जमान्यातील जनरल डाय़र होता आता हे भाजप जमान्यातील जनरल कायर

एक जनरल डायर होते आता एक जनरल कायर आहेत. जनरल डायरने जालियनवाला बागमध्ये ज्याप्रकारे हत्याकांड केले होते त्यातही शेतकरी होते. तो ब्रिटीशांच्या जमान्यातील जनरल डाय़र होता आता हे भाजप जमान्यातील जनरल कायर आहेत. ते आपल्या कायरतेने शेतकऱ्यांची हत्या करतायत शेतकऱ्यांना घाबरतायत. आमच्या देशाच्या राजधानीत येण्यापासून रोखत आहेत. ही कायरता आहे आणि म्हणूनच मी त्यांना जनरल कायर बोलत आहे असल्याची टीका संजय राऊच यांनी मोदींवर केली

उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील.

महानंदा गुजरातला गेले आहे यावर संजय राऊत म्हणाले, यावर मी आधीही टिका केलेली आहे. एकएक या महाराष्ट्रातील संस्था, उद्योग हा गुजरातकडे वळवला जातोय. उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील. महानंदाचे चेअरमेन राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. मेहुणे मेहुणे पाहुणे आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा. तिथे शेकडो कर्मचारी आहेत. काय केले या विखे पाटीलांच्या पाहुण्यांनी, मेहुण्यांनी. यावर मत व्यक्त करा. तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची. स्वत:च्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत. स्वत:च्या खोक्यांचे राजकारण बरोबर चाललेले आहे.

एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस ही लाचार लोकं मुंबईचा सौदा करायला निघाले आहेत.

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्लॅन यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, ही निवडणुकीची गोष्ट नाही. जेव्हापासून फडणवीस, शिंदे, अजित पवारांचे सरकार आले तेव्हापासून मुंबईबाबत जो केंद्र सरकार निर्णय घेत आहे त्याने सर्वांच्या मनात भिती आहे. ज्यापद्धतीने मुंबईचा उद्योग, मुंबईच्या आर्थिक संस्था तुम्ही गुजरातमध्ये घेऊन जात आहात. आता महानंदाही घेऊन जात आहात. ज्याप्रकारे मुंबईला अदाणी धारावी विकले, मीठाची जमिन विकली, सगळंच विकल. त्यामुळे आम्हीला भिती मुंबईबाबत आहे. बरं यात चुकीचे काय आहे? देवेंद्र फडणवीस मुंबईचा सौदा करायला जात आहेत. त्यांच्यात हिंमत नाही की महाराष्ट्राचा नेता असूनही या निर्णयाला विरोध करतील. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस ही लाचार लोकं आहेत ती मुंबईचा सौदा करायला निघाले आहेत. महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार गुजरातवरुन चालेल. हे सरकार स्वत:ला मानतात एक डेअरी चालवू शकत नाहीत? एक डेअरीपण या लोकांनी विकली . पण आपआपल्या लोकांच्या डेरी सुरु आहेत. विखे पाटलांची डेअरी सुरु आहे. गोकूळ, वारणा या डेअरी सुरु आहेत, पण महाराष्ट्र सरकारची डेअरी आणि या डेरीसोबत गोरेगावरमध्ये 50 एकर ती 50 एकरची प्राईम लोकेशनवर जमिन आहे. ती जमिन विकण्याचा कट आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पावर सामिल आहेत आणि ती जमिनही अदाणींना द्यायला निघाले आहेत ही लोकं असा हल्लाबोल यावेळी केला.

27 तारखेला प्रमुख पक्षनेते एकत्र येऊन जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार

महाविकास आघाडीचा फॉर्म्युल्याबाबत संजय राऊत म्हणाले, उत्तरप्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीध्ये जागावाटप पूर्ण झालं आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटप पूर्ण झालेले आहे. तामिळनाडून शेवटच्या टप्प्यात आहे. मला खात्री आहे की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजनआघाडी ही महाविकास आघाडी आहे त्यामध्ये या सगळ्यांना काही करुन भाजपची हुकूमशाही पराभूत करायची आहे. आमचं जागावाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरु आहे. आणि 27 तारखेला प्रमुख पक्ष नेते एकत्र येऊन या संदर्भातील जागावाटपाबाबत आम्ही अंतिम निर्णय घेणार आहोत. आमचा कोणता फॉर्मयुला नाही 38 जागा आहेत, जिथे ज्यांची ताकद आहे. जिथे ज्यांची सत्ता आहे तिथे त्यांना जागा मिळणार हाच आमचा फॉर्मयुला. 27 तारखेला दुपारी चारही प्रमुख नेते एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील.

शिवसेना 23 जागांवर लढेल 

भाजप ही अनेक गॅंग तयार करुन राजकारण करते. अजित पवार, शिंदे या टोळ्या आहे. या टोळी युद्धात पडायचे नाहीय. शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भाजप बरोबर स्वाभिमानाने 23 जागांवर लढत होती आणि मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने सांगतो की, यावेळीही शिवसेना 23 जागांवर लढेल आम्ही खरी शिवसेना आहोत. आम्ही फेकलेल्या तुकड्यांवरची जगणारी लोकं नाही, आम्ही लाचार नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, नाना पटोले आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत आम्ही व्यवस्थित जागावाटप करु असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.