फिक्सिंगची चिरफाड; उद्धव ठाकरे यांची उद्या मुंबईत महापत्रकार परिषद

लोकशाही व संविधानाची तिरडी बांधणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील खोटारडेपणा जनतेच्या साक्षीने उघडा पाडणार

सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली चौकट झुगारून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर निकाल दिला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गद्दार मिंध्यांच्या हाती सोपवली. याबद्दल राज्याच्या कानाकोपऱ्यात संताप असून लोकशाही आणि संविधानाची तिरडी बांधणाऱ्या नार्वेकरांच्या निकालपत्राची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जानेवारीला खुली चिरफाड करणार आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच जनतेच्या न्यायालयात त्यांची महापत्रकार परिषद होत असून जनतेलाही त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. वरळीतील डोम सभागृहात ही परिषद होईल.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज ही माहिती दिली. शिवसेनेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्यासंदर्भात महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. नार्वेकर यांचे पुतळे जाळले जात आहेत, त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत. ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे, राज्यघटना वधस्तंभावर चढवली आहे अशा भावना लोकांच्या मनात आहेत असे नमूद करताना खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती. विधानसभा अध्यक्ष पद हे संवैधानिक पद असून त्या पदावरील व्यक्ती ही कधीही पक्षपात करत नाही. पण राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला. वरळी येथील डोम सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यात कायदा क्षेत्रातील तज्ञांचाही समावेश असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.