उद्धव ठाकरे उद्या ठाण्यात; भगव्या सप्ताहात भव्य मेळावा

स्थळ – गडकरी रंगायतन

वेळ – सायं. 6.30 वा.

छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांची तोफ शनिवारी 10 ऑगस्ट रोजी ठाण्यात धडाडणार आहे. भगवा सप्ताहानिमित्त शिवसेनेचा भव्य मेळावा गडकरी रंगायतन येथे होणार असून या मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे विश्वासघातकी भाजप आणि गद्दार मिंधेंचा कसा समाचार घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू असून ठाणे शहरासह जिल्ह्यात शिवसैनिकांचे झंझावाती सामाजिक उपक्रम सुरू आहेत. या सप्ताहानिमित्त शिवसैनिकांचा भव्य मेळावा शनिवारी गडकरी रंगायतन येथे होणार असून उद्धव ठाकरे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडणाऱ्या भाजपच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवल्या होत्या. त्यानंतर दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी विविध पक्षांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्याची देशभरातील मीडियाने दखल घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यात येणार असून त्यांच्या या मेळाव्यात ते काय बोलणार, विरोधकांचा कसा समाचार घेतात याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी केली आहे.