महाविकास आघाडीत 175 जागा जिंकत 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करणार; संजय राऊत यांचा विश्वास

महाविकास आघाडीत सर्व उत्तम सुरू आहे. आम्ही 90-90-90 जागा जाहीर केल्या आहेत. आमच्यात उत्तम समन्वय आहे, कोणीही चिंता करू नये, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत चांगलाच टोला लगावला. तसेच महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढतीची लागण लागणार नाही, आम्ही सर्व गोष्टी चर्चेतून सोडवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडी 175 जागा जिंकत 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीत चांगल्याप्रकारे समन्वय आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकमेंकाच्या संपर्कात आहेत. तसे नसते तर आम्ही 90-90-90 जागा जाहीर केल्या नसत्या. त्यामुळे आमच्यात उत्तम समन्वय आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत असतात. तेथून काही सूचना असतात. त्यासाठी काँग्रेसचे नेते दिल्लीत होते, अशी आपली माहिती आहे. मात्र, काही जागांवर चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

आज आणि उद्या उमेदवारी अर्ज भरण्यात येणार नाही. त्यामुळे काही जागांवर चर्चा करण्यात येतील. आमच्यात काहीही तिढा किंवा वाद नाही. काही मतभेद असल्यास किंवा काही विषय असल्यास ते चर्चेने सुटणार आहेत. नाना पटोले यांच्याशी संवाद सुरू आहे. आम्ही चर्चा करून नांदेड उत्तर आणि हिंगोली जागेची अदलाबदल केली. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या काळात पत्र पाठवण्यात येतात. त्यात औपचारिकता असते. तसेच चर्चेसाठी कागद उपलब्ध असतो. त्यासाठी पत्रं पाठवण्यात येतात. कामाच्या व्यापात अनेक गोष्टी डोक्यातून निघून जातात. काही विसरायला होतात. त्यामुळे पत्रं. कागद समोर असेल तर त्यावर चर्चेवेळी संवाद होतो. देशाचे सरन्यायाधीश अपात्रतेबाबतचे ठोस पुरावे असतानाही, ते मानायला तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार उपस्थित असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना देण्यात येतो, त्यामुळे नाराजीच्या पुरव्यांवर आणि त्याबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय असून कोठेही नाराजी नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 175 जागां जिंकत 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करणार आहे. महाविकास आघाडीला 170 ते 175 जागा निश्चितच मिळणार आहेत. आमचे सर्व उत्तम सुरू आहे. कोणीही चिंता करण्याची गरज नाही. कोणाला शंका असल्यास संध्याकाळी आम्ही महाविकास आघाडीतील नेते एकत्र असतो, त्यावेळी खात्री करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

पक्षाच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही मतं व्यक्त केले असेल तर ती नाराजी नाही. राज्यात तिन्ही पक्ष तोलामोलाचे आहेत. ते राहुल गांधी यांनांही माहिती आहे. आमचे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांची नाराजी असती किंवा काही चर्चा करायची असती, तर त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती. त्यामुळे त्यांच्या नाराजीबाबत पसरवण्यात येणाऱ्यां अफवांवर विश्वास ठेऊ नये. काहीजण मुद्दाम अशा बातम्या पसरवत आहेत, असेही ते म्हणाले.

शेकापशी चर्चा सुरू आहे. आज त्यांच्याशी चर्चा पूर्ण होईल. ज्या ठिकाणी मित्रपक्ष जिंकण्याची शक्यता आहे. त्या जागा मित्रपक्षांना दिल्या जातील. ज्या जागा आम्ही जिंतलो आहोत, त्या आमच्याकडेच आहे. आम्ही कोणाच्याही जागेवर दावा केलेला नाही. अलिबाग, सांगोल या आमच्या जागा आहे. शिवसेनेने त्या जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे काही राहिलेल्या जागांवर अदला-बदलीबाबत आज आणि उद्या चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती होतील, असे वाटत नाही. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत 4 तारखेपर्यंत सर्व गोष्टी सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.