राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना सन्मानजनक वागणूक द्यावी; संजय राऊत यांची भूमिका

Pc - Abhilash Pawar

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घेडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटापाबाबत काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत येत असून ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीत काही जागांवर असलेला पेच संपून हा तिढा सुटेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना सन्मानजनक वागणूक दिली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी काल आपली चर्चा झाली होती. तसेच आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला महाराष्ट्रात येत असून ते मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा करतील. त्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. तसेच काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी चर्चा झाली आहे. जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांशी चार ते पाच तास चर्चा झाली आहे. आता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद किंवा रस्सीखेच नाही.आजही आमच्यात चर्चा होणार आहे. काल झालेली चर्चा सकारात्मक झाली आहे.

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली आहे. ही चर्चाही सकारात्मक झाली आहे. तुटेपर्यंत ताणू नये, ही सूचनाआमच्यासह आघाडीतील सर्व पक्षांना लागू होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि आमच्यात चर्चा करून तिढा सोडवण्याची मानसीकता आहे. त्यामुळे आता आमच्यात कोणतेही पेच नाही. तसेच आज काँग्रेस नेत्यांशी चर्चा होणार आहे. जागावाटपाबाबतची चर्चा कोठेही थांबलेली नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आपण कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही. आपण पक्षाची भूमिका मांडतो. तसेच उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय आपण काहीही बोलत नाही किंवा भूमिका मांडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकाणात आघाडी युती होते, तेव्हा जागावाटपाबाबत असा तिढा नेहमी असतो. शिवसेना आणि भाजपची युती असतानाही असा तिढा होता. काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष आहे. तर आमचा प्रादेशिक पक्ष आहे. राज्यात प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षांनी स्थान दिले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्याबाबत आमच्यात चर्चा होत आहे. सध्या देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे आहेत. चंद्राबाबू नायडू किंवा नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक पक्ष नसते तर मोदीचे सरकारच स्थापन होऊ शकले नसते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. तसेच इंडिया आघाडीच्या यशात प्रादेशिक पक्षांचे महत्त्वाचे योगदान आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत गहाण टाकण्याचे काम मुख्यमंत्री आणि इतर नेते करत आहेत. दिल्लीदरबारी नाकदुऱ्या काढण्याचे काम ते सध्या करत आहेत. आता त्यांच्या कपड्यांमागे दिल्लीतील लॉनची हिरवळ लागलेली दिसते. त्यामुळे दिल्लीत ते किती तास ताटकळत उभे असतात. तसेच ते किती तास लॉनवर वाट बघतात, हे त्यावरून दिसून येते. दिल्लीतील राजकारण आपल्याला चांगलेच माहिती आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटातील नेते स्वाभिमान गहाण टाकण्याचे काम करत आहेत, असा हल्लाबोलतही संजय राऊत यांनी केला.