भविष्यात ‘नो इलेक्शन’ हेच त्यांचे धोरण; संजय राऊत यांचा मोदी सरकारवर घणाघात

भाजपला देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच वन नेशन वन इलेक्शनसारखे फंडे भाजप आणत आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वन नेशन वन इलेक्शन संविधानविरोधी असून देशातील लोकशाहीला घातक असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

ते तीन वर्षात महापालिका निवडणुका घेऊ शकलेले नाहीत. मणिपुरात पळून जाणाऱ्या सरकारने वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा, हे आश्चर्यकारक आहे. आपला देश लोकशाहीप्रधान असून जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. प्रत्येक प्रांत, भाषा, संस्कृती विविध आहेत. विविधतेतच एकता आहे. याचा विचार करून संविधानकारांनी संविधान बनवले आहे. आता ते संविधान बदलण्याचा प्रयत्न होत आहे. एकाचवेळी ईव्हीएम किंवा यंत्रणेचा गैरवापर करत केंद्र आणि राज्यातील निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

भाजपने आधी महापालिका आणि राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवाव्यात. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीविरोधी आहे. भविष्यात नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची ही सुरुवात आहे. भाजपच्या अशा धोरणांमुळे देशालाचा धोका आहे. त्यामुळे नो नेशन नो इलेक्शन हा त्यांचा फंडा आहे काय, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. आम्ही इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसून यावर चर्चा करणार आहोत. संसदेत याबाबतचे विधेयक येण्यापूर्वी यावर चर्चा करण्यात येईल. भाजपचा प्रत्येक निर्णय संविधानाला आव्हान देणारा आहे. सविधानातील सर्व तरतुदी लोकशाहीसाठी आवश्यक आहेत. मोदी सरकार त्याच संविधआनवार हल्ला चढवत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

निवडणुकांवरील खर्च वाचवण्यासाठी हा फंडा आणल्याचे सांगितले जात आहे, त्यावर संजय राऊत म्हणाले की, मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागेले, ते अर्थतज्ज्ञ कधीपासून झाले? अनेक वर्षांपासून या निवडणुका होत आहेत. लोकशाही आणि देशासाठी या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे घटनाकारांनी त्याबाबत तरतुदी केल्या आहेत. मोदी आणि भाजपने नवे संविधान किंवा नवा कायदा आणू नये. यात त्यांचा स्वार्थ आहे. लोकसभेत आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्याने अशाप्रकारचे फंडे ते आणत आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

हे देशविरोधी कृत्य आहे. त्यांना एकाचवेळी निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र, याचा देशाला काहीच फायदा नाही. देशाची एकात्मका, संस्कृती, लोकशाही विरोधात असल्याने याला आमचा विरोध आहे. निवडणुकांवर खर्च होतो, असे त्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी देशातील लूच थांबवावी. भ्रष्टाचार आणि दरोडेखोरी सुरू आहे, ती आधी थांबवावी. निवडणूकीवर होणारा खर्च ही लूट नाही, ती लोकशाहीची गरज आहे. लाडक्या उद्योगपतींसाठी जी लूट सुरू आहे, ती थांबवण्याची गरज आहे. महाराष्ट्रात प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या माहापालिकेत प्रशासकांच्या माध्यमातून लूट सुरू आहेत. ही लूट करता यावी, यासाठीच महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येत नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. आम्ही सर्व मित्रपक्षांशी चर्च करून प्रत्येक जागेवर चर्चा करत आहोत. मुंबईसह राज्यातील जागावाटप लवकरच पूर्ण होणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झालेले असेल. लोकसभा निवडणुकीत योग्य जागावाटप झाल्याने मोदींचा पराभव झाला. आता राज्यातील शिंदे, फडणवीस, अजित पवार या त्रिकुटाचा पराभव महाविकास आघीडी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिंकेल त्याची जागा हेच आमचे सूत्र असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.