मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मोठा सन्मान; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मोठा सन्मान असल्याचे सांगितले. तसेच अनेक वर्षांच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले आहे, असे सांगितले. तसेच महाविकास आघाडी मजबूत असून याबाबत आमची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. मराठी, बंगाली, पाली, आसामी,प्राकृत या भाषांना हा दर्जा देण्यात आला आहे. पाच भाषांना हा दर्जा देत त्यांच्या सन्मान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भाषा आहे. ही संताची भाषा आहे. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुहृदयसम्राच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही भाषा आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. राज्यातील सर्व पक्षांनी सर्व मुख्यमंत्र्यांनी संसदेत अनेक वर्ष हा मुद्दा मांडला होता. शिवसेनाही त्यात नेहमी आघाडीवर होती. आता मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने या लढ्याला यश आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आता महाविकास आघाडीत अनेक पक्ष झाले आहे. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यासोबतच कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष असे अनेक पक्ष असल्याने आघाडीत नवीन पक्षाला स्थान दिल्यास जागावाटपात अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. तरीही याबाबत शरद पवार किंवा आमच्या मित्रपक्षांनी काही निर्णय घेतला असल्यास किंवा त्यांच्या काही सूचना असल्यास त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.