देशातील महत्त्वाच्या संस्थावर भाजपचा कब्जा; संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगितले. तसेच देशातील तपाय यंत्रणांवर भाजपने कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच महाविकास आघाडी एकत्र असून आमच्यात कोणतीही बिघाडी नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच बिघाडी तर समोरच्या गटात दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद मंगळवारी ( 9 एप्रिल रोजी) गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी 11 वाजता शिवालय, नरीमन पॉईंट येथे होणार आहे. महाविकास आघाडी एकत्र असून आमच्यात सर्व आलबेल आहे, हा संदेश देण्यासाठीच ही संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येत आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आमच्या महाविकास आघाडीत काहीही बिघाडी नाही. बिघाडी तर समोरच्या गटात दिसत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महायुतीत जागावाटपही अद्याप झालेले नाही, तिन्ही गटात रस्सीखेच सुरू आहे. मिंधे गटातील अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्यातच अंतर्गत वादावादी सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीत सर्व सुरळीत सुरू आहे. त्यासाठी उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील थोडे, किरकोळ वाद मिटले आहेत. कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत त्यांची समजूत घालण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचे मन राखणे, ही मोठी जबाबदारी असते. आता महाविकास आघाडीतील सर्व वाद मिटले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपची आजची स्थिती स्पष्ट दिसत आहे. 10 वर्षे सत्तेत असतानाही त्यांना मते मागण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रचारासाठी योगी यांना महाराष्ट्रात बोलवावे लागत आहे. त्यांनी त्यांच्या राज्यात प्रचार करावा, त्यांनी त्यांच्या राज्यात थांबणे गरजेचे आहे. त्या राज्यात वीजसमस्येसह अनेक समस्या आहेत, त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी सरकारी लवाजमा घेत मते मागण्यासाठी जात आहेत, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. पंतप्रधानांनी एका पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी विमाने, सरकारी यंत्रणा यांचा वापर करणे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, हे त्यांना माहिती असायला हवे. पश्चिम बंगालमध्ये एनआयएने कारवाई केली आहे, त्यादरम्यान एका महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. तृणमूल काँग्रेस या गोष्टी उघड करत असेल तर देशासमोर सत्य परिस्थिती येईल. निवडणुकीच्या काळात ईडी, सीबीआय, आयकर विभआग, एनआयए विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. काही समाजविघातक गोष्टी घडत असतील तर त्या राज्यातही सरकार आहे, पोलीस आहेत, राज्याच्या तपासयंत्रणा आहेत, ते त्यांचे काम चोख बजावतील, असेही ते म्हणाले.

ज्या नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे, ते भाजपात जाऊन उमेदवार होऊ शकतात, तर आम्ही दिलेल्या उमेदवारांच्या मागे ईडी चौकशी लावली जाते. अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही. अमोल किर्तीकर हे आमचे उमेदवार आहेत. ईडी चौकशीमुळे त्यांच्या उमेदवारीवर काहीही परिणाम होणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले,स्वतः पंतप्रधान मोदी यांनी आरोप केलेले आणि खटले सुरू असेलेले नेत्यांना ते पक्षात घेत उमेदवारी देतात आणि अमोल किर्तीकर यांच्यामागे ईडी चौकशी लावतात. देशाच्या महत्त्वाच्या संस्थावर सरकारने कब्जा केला आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.