विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांचा मेंदू काम करणे बंद करेल – संजय राऊत

Pc - Abhilash Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून कोण आहे, याबाबत त्यांनी वक्तव्य केले होते. या फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांना टोला लगावला.

शरद पवार यांच्या मनात काय चालले आहे, ते फडणवीसांना 100 जन्म घेतले तरी कळणार नाही. त्यांना शरद पवार यांच्या मनातले कळले असते तर त्यांची आणि त्यांच्या प्रतिष्ठेची एवढी घसरण झाली नसती. फडणवीस यांच्याकडे मेंदू आहे काय, असा प्रश्न पडावा अशी वक्तव्ये ते करत आहेत. शरद पवार यांच्या मनातील त्यांना समजले असते तर आज त्यांची अशी अवस्था झाली नसती. 2019 मध्येही शरद पवार यांच्या मनात काय आहे, ते फडणवीस यांना समजले नाही. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यात हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका वेळेत घ्या. निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या मनात काय आहे, ते सगळ्यांनाच समजेल. ते समजल्यावर फडणवीसांचा मेंदू काम करणे बंद करेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

निवडणुकासाठी चार हजार कोटी बाजूला ठेवणारा, 50 खोक्यांना आमदार आणि 100 खोक्यांत खासदार विकत घेणारा सामान्य माणूस कसा असून शकतो, असे असेल तर सामान्य माणसाची व्यख्या बदलावी लागेल, असा टोलाही त्यांनी मिंध्यांना लगावला. सामान्य माणसांचा मुख्यमंत्री राज्यात ठेकेदारांचे राज्य चालवत नाही. प्रत्येक गोष्टीत पैसे खातात. निवडणुकीत एवढा पैसा खर्च करण्यासाठी ते पैसे आणतात कोठून, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

एजन्सीने सांगितलेले अजित पवार बोलले असतील. घरफोडी कोणी केली, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात फोडोफोडी केली. त्यांच्या फोडफोडीच्या राजकारणाला अजित पवार बळी पडले, हे त्यांनी मान्य करावे. त्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवण्यात आली की नेमके काय झाले ते या राजकारणाला बळी पडले. अशा माणसांना खंत वैगरे काहीही वाटत नाही. त्यांचे स्वार्थी राजकारण असते. मी आणि माझा खोका एवढेच त्यांना समजते. जनतेशी, भावभावनांशी त्यांचे काही देणेघेणे नाही, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.