आज अजित पवार गटाचा बळी गेला, तर उद्या मिंधे गटाचा बळी निश्चित; संजय राऊत यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीपुर्वी आलेले अनेक सर्वे खोटे ठरले. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी असे काही सर्वे केले जातात. अशा सर्वेवर आणि सर्वेच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार येणार, हे निश्चित आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल होणार असून सत्ताबदलाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीपुर्वी अनेक सर्वे आले होते. त्यात 400 पारचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना 5 जागा मिळणेही कठीण आहे, असे सांगण्यात आले होते. तर महाराष्ट्रात भाजपला 24 जागा मिळतील, असे भाकीत होते. त्या सर्वेचे काय झाले आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशाप्रकारचे कोणतेही सर्वे, अफवा यावर जनतेने विश्वास ठेऊ नये. राज्यात निश्चितपणे सत्ताबदल होत आहे. याबाबतच्या परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अशा सर्वेच्या माधअयमातून अफवा पसरवण्यात येत आहे. मात्र, कोणत्या ठिकाणी काय निकाल लागणार आणि सत्ताबदल होणारच, याबाबत आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.

निवडणुकीपूर्वी आघाडीचा चेहरा ठरवणे, गरजेचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत आहे. काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मात्र, काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारखे काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही ,तर ते हिसकावून घेऊ, असे वक्तव्य शरद पवार किंवा आमच्या पक्षाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशी वक्तव्ये ज्या नेत्याबाबत करण्यात येतात, त्यांना ती अडचणीची ठरू शकतात, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. नाना पटोले हे काँग्रेसमधील संयमी आणि निस्वार्थी नेते आहेत. पक्षाच्या विजयासाठी ते अथक परिश्रम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचे काम करू नये, असेही त्यांनी सांगितले.

भाजप आणि मिंधे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी आहेत. भाजपवर कोणीही विश्वास ठेऊ नये, ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. आता ते अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढतील. ते मिंधे गटाची गर्दन उडवतील, ते अत्यंत निर्दयी आहेत. याचा अनुभव आमच्यासह भाजपच्या देशातील अनेक मित्रपक्षांनी घेतला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याला मिंधे गटातील काहीजणांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांना दूर केले,तर विधानसभेसाठी जास्तीतजास्त जागा लढण्यासाठी मिळवण्याचा त्यांचा डाव आहे. अजित पवार काकांशी बेइमानी करत मोठा धोका पत्करून भाजपसोबत आहेत. मात्र, गरज सरो, वैद्य मरो, अशी भाजपची भूमिका असल्याने अजित पवार यांना अडचणीत आणणारी विधाने मिंधे गट आणि भाजपकडून करण्यात येत आहेत.

आज पहिला बळी अजित पवार गटाचा जाणार असेल, तर उद्या मिंधे गटाचा बळी जाणार, हे निश्चित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत राज्याचे नेतृत्व मिंधेकडे राहू नये, यासाठी आतापासूनच भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचा सर्व खर्च करा, असे आदेश दिल्लीतून मिंधे यांना देण्यात आले आहे. त्यांच्याकडून झारखंड आणि हरयाणातील निवडणुकीचा खर्चही वसूल केला जात आहे. हा खर्च केला तर राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडे द्यायचे की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे मिंध्यांचे पद पैशांवर टिकून आहे. त्यासाठी राज्यात भ्रष्टाचार आणि लूटमार सुरू आहे. राज्यातील पैसे लुटून मुख्यमंत्र्यांना दिल्लीला थैल्या पोहचव्यावा लागत आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

आता मध्य प्रदेशात लष्करी जवानांच्या ट्रनच्या घातपाताचा प्रयत्न झाला. याबाबत रेल्वेमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी. हा देशाच्या सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिकट झाली आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास ते अद्यापपर्यंत करू शकले नाहीत. त्यांनी या घातपाताच्या प्रयत्नाबाबत बोलण्याची गरज आहे, असेही संजय राऊत म्हणाले.