मिंध्यांनी त्यांची विकृती दाखवली, आता माफी, खुलासे ही सर्व नौटंकी; आनंद आश्रमातील घटनेवरून संजय राऊत कडाडले

ठाण्यातील आनंद आश्रमात घडलेली घटना मन विचलीत करणारी आहे. या घटनेतून मिंधे गटाने आणि त्यांच्या गुंडांनी त्यांची विकृती दाखवून दिली आहे. त्यामुळे आता खुलासे, माफी ही सर्व नौटंकी आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर हल्ला चढवला. आनंद आश्रम ही जागा बळकावून त्यात ठाण्याची मान खाली जाईल, असे कृत्य करण्यात आले, ही लाजिरवाणी घटना आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

खुलासे आणि माफी ही सर्व नौटंकी असते. राजकारणात राज्यकर्ते म्हणून त्यांची संस्कृती आणि विकृती काय आहे, ते आनंद आश्रमातील घटनेतील दिसून येत आहे. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडलेली ही घटना मन विचलीत करणारी आहे. ठाण्याने राज्यात अनेक साहित्यिक कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते निर्माण केले. ठाण्यानेच शिवसेनेला राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळवून दिली. आनंद दिघे यांना ते गुरु मानतात. त्यांच्या पवित्र वास्तूत मिंधे सेनेच्या गुंडांनी लेडीज बारमध्ये उडवतात, त्याप्रमाणे पैसे उधळण्याचा उपक्रम साजरा केला. ही लाजिरवाणी घटना आहे, असे त्यांनी सांगितले.

आनंद दिघे यांच्या वास्तूतील भिंतीवर हंटर ठेवलेला असायचा. त्याचा अर्थ म्हणजे चुकाल तर चाबकाचे फटके बसतील. आज दिघे साहेब असते तर त्यांनी मिंधे सेनेच्या गुंडांना चाबकाने टेंबी नाक्यावर चाबकाने फोडून काढले असते. सुसंस्कृत ठाण्यात त्यांनी असे वर्तन केले आहे. मुळात त्यांनी आनंद आश्रमाचा बेकायदा ताबा घेतला आहे. मूळ मालक असलेल्या पारशांच्या ट्रस्टला धमक्या देत, धाक दाखवत त्यांनी ती जागा बळकावली आहे. ती जागा शिवसेनेची आहे. आनंद दिघे यांची ती वैचारिक संपत्ती आहे. आनंद दिघे म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता नाही. ठाण्यातील जनतेची मान खाली जाईल, असे कृत्य त्यांनी केले आहे. यातून त्यांनी त्यांची विकृती दाखवून दिली आहे. मिंधे सेनेच्या सरदार, शिलेदारांकडून ही संस्कृती झिरपत खाली आली आहे. त्यामुळे आता माफी मागणे, खुलासे करणे, काहींना पदावरून काढणे ही पूर्णपणे नौटंकी आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वमान्य नेते आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांनी तडजोड करावी, असे त्यांना कोणी सांगितले असेल असे वाटत नाही. देशात 10 वर्षांपासून ज्याप्रकारची हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे. एकप्रकारे आणिबाणी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्याशी तडजोड करू नका, असे गडकरी यांनी विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याने सुचवले असेल, तर ते योग्यच आहे, असेही राऊत म्हणाले. सत्तेत बसून स्वातंत्र्य आणि देशातील मूल्यांशी कोणी तडजोच करत असेल तर तो राष्ट्रीय अपराध आहे. गडकरी याविरोधात सातत्याने बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले, म्हणून त्यांना कोणी असा सल्ला दिला असेल तर यात कोणाला त्रास होण्याचे काही कारण नाही, असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) किंवा महाविकास आघाडीत, कोणतीही रस्सीखेच नाही. महाविकास आघाडी एकत्र असून एकसंघ राहिल, जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही संजय राऊत म्हणाले.