फडणवीस गृहमंत्री पदावर बसण्यालायक नाहीत; संजय राऊत यांचा हल्लाबोल

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे दिसून येते. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा सावल निर्माण होत आहे. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. भाजप, सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा कायदा आणि विरोधकांसाठी वेगळा कायदा असे प्रकार राज्यात सुरू आहेत. राज्यातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिच अँड रनप्रकरणाची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांनी या मुद्द्यावरून भाजप आणि फडणवीस यांच्यावर तोफ डागली.

राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. त्यांनी नागपूर हिट अँड रन अपघाताची माहिती द्यावी, ती कार कोणाच्या नावावर आहे, ती कोणाची अपघात कोणाच्या गाडीने झाला? गाडी कोण चालवत होते. चालकाची अदलीबदली करण्यात आली. गाडीची नंबरप्लेट काढण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर ही लपवाछपवी का करण्यात आली, याची माहिती फडणवीस यांनी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

गाडी चालवणारे शहजादे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे, ते दिसून येते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या नागपूरमधून आले आहेत. त्या शहराची अशी अवस्था झाली आहे. जर या ठिकाणी इतर पक्षांच्या नेत्यांचा मुलगा असता तरी फडणवीसांच्या फौजेने हल्ला चढवला असता. मात्र, याठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्षांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ते मृत्यूशी झुंज देत आहेत. तरीही एफआयआरमध्ये वाहनचालकाचे नावही टाकण्यात आलेले नाही. त्याने चार गाड्यांना ध़डक दिली. चार जणांना चिरडले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे, असे असूनही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे, असेही राऊत म्हणाले.

गाडी बावनकुळे यांची किंवा त्यांच्या मुलाची आहे. मद्यधुंद स्थितीत तो गाडी चालवत होता. सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे असताना कायदासुव्यवस्थेच्या नावाखाली विरोधकांवर कारवाई करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदावर बसण्यालायक नाही. राज्याचे गृहमंत्री फडणवीस आहेत, तोपर्यंत कोणत्याही अपराधाची पुनर्चौकशी होणार नाही. जोपर्यंत रश्मी शुक्ला डीजी आहेत, तोपर्यंत पुन्हा चौकशी होणार नाही. कायदा फडणवीसांसमोर नाचत आहे. बावनकुळे यांच्या मुलाने रस्तात दोनजणांना चिरडले असून एफआयआरमध्ये नावही घेण्यात आले नाही. लाहोरी बारमधील सीसीटीव्हीमध्ये मद्यपान कोण करत होते. गाडीत कोण बसले कोणी चावली हे सर्व आहे. मात्र, ते फुटेज आता उपलब्ध नसेल, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

हा मुद्दा बावनकुळे किंवा त्यांच्या मुलाचा नसून राज्यातील कायदासुव्यवस्थेचा झालेला कचरा यातून दिसून येतो. भाजप आणि मोदी समान कायद्याच्या बाता करतात. मात्र, राज्यात तसे दिसत नाही. सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी वेगळा कायदा आहे काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आली. चालक बदलण्यात आला, हाच कायदा राज्यात आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.