दहा वर्षांपूर्वी 15 लाख देणार होते, आज 1500 रुपये देतात, भाऊ पक्के लबाड; भास्कर जाधव यांची फटकेबाजी

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा शिवतीर्थावर दिमाखात पार पडला. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी लाडकी बहीण योजनेवरून मिंधे सरकारच्या खरपूस समाचार घेतला. आमच्या महिला भगिनींना 1500 रुपये मिळाले त्याबद्दल फार मोठी चिंता करायचे कारण नाही. कारण आमच्या महिला भगिनींना माहित आहे, 2014 साली 15 लाख रुपये देणार होते. ते आज 10-11 वर्षानंतर 1500 रुपये देतात, भाऊ पक्के लबाड आहेत, असे म्हणत भास्कर जाधव यांनी मिंधे सरकारचा समाचार घेतला.

दोन गोष्टींवर फक्त मी बोलणार आहे. हे राज्यात आलेलं सरकार हेच मुळात विश्वासघाताने आलेलं सरकार आहे. हे विश्वासघातकी सरकार आहे आणि जे विश्वासघातानं विश्वासघातकी सरकार आलेलं आहे ते सर्वांचं विश्वासघातच करणार हे महाराष्ट्रानं लक्षात घेतलं पाहिजे, असे पुढे भास्कर जाधव म्हणाले.

काय झालं मराठ्यांच्या आरक्षणाचं? एकनाथ शिंदेनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितलं की आम्ही कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण मराठ्यांना देणार आहोत. मला वाटतं दोन दिवसांमध्ये निवडणूक जाहीर होणार आहे. हे आरक्षण जाहीर कधी करणार आणि ते कोर्टामध्ये न्यायाच्या कसोटीला कधी उतरणार हे देखील आपण लक्षात घ्या, असे भास्कर जाधव म्हणाले.

मी धन्यवाद देतो मनोज जरांगे पाटलांना. त्यांनी वेळीच यांना ओळखलं आणि वेळीच आपलं उपोषण सोडलं. कुठे आहेत छगन भुजबळ, परवाच्या दिवशी ओबींसींमध्ये 8 ते 10 जातींचा उपवर्गीय म्हणून अंतर्भाव केला. याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण आम्ही जाऊ देणार नाही, कमी होऊ देणार नाही सांगितलं. पण त्याच्यामध्ये या 8-10 जाती घालून जाती-जातींध्ये लढे उभे करायचा प्रयत्न केला, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.

आज बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका हजारोच्या संख्येने मोर्चे काढताहेत. सरकार नवनवीन घोषणा करतंय, पण माझ्या भगिनींना माहीत आहे हे लबाड लोक आहेत. विश्वासघातकी सरकार आहे. हे विश्वासघाताने सरकार आलेलं आहे, हे आमचा देखील विश्वासघात करतील, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला.

दहा वर्षापूर्वी 400 रुपयांचा गॅस सिलेंडर 1200 रुपयांना गेला आणि गेल्या वर्षी देशाच्या पंतप्रधानाने खूप मोठं लांबलचक भाषण केलं आणि सांगितलं की बहिणींना आम्ही भाऊबीज देतोय. काय भाऊबीज दिली? दहा वर्षे 1200-1400 रुपये सिलेंडरचे घेतले आणि 200 रुपये भाऊबीज दिली. बहिणींना माहित आहे की आमचा भाऊ लबाड आहे. म्हणून नावावर आलेले 1500 रुपये एकाही महिलेने खात्यावर ठेवले नाहीत. सगळ्यांनी काढून घेतलेत. कारण त्यांना माहित आहे हे भाऊ लबाड आहेत. हे पैसे खात्यावर ठेवून चालणार नाही. हे भाऊ चोर आहेत हे सर्वांना माहित आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

चार दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातले आदिवासी आमदार आणि विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयाच्या चौथ्या-पाचव्या मजल्यावरून उड्या टाकतात. याचा अर्थ या सरकारवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. कारण हे सरकार विश्वासघातकी आहे, असेही पुढे भास्कर जाधव यांनी नमूद केले.