शिवसेना, इंडिया आघाडीचे अनंत गीते यांना विजयाचा विश्वास; रायगडचा खासदार कोण? आज मतदान

रायगडचा खासदार कोण? हे ठरवण्यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. 2 हजार 185 केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रायगडच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून मुख्य लढत शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे सुनील तटकरे यांच्यात होणार आहे. 16 लाख 62 हजार 372 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या तसेच पदयात्रा, घरोघरी संपर्क, सोशल मीडिया याद्वारे प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शेकापचे सरचिटणीस व आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचार सभांनी रायगडचे वातावरण इंडिया आघाडीमय झाले आहे.

दोन हजार पोलीस, दीड हजार होमगार्ड
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. १८७ पोलीस अधिकारी, २ हजार ६० पोलीस कर्मचारी, १ हजार ३६३ होमगार्ड, २४३ सीआरपीएफ जवान आणि २३ शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच तीन सीआरपीएफ तुकड्यादेखील सज्ज आहेत.

रायगडातील सर्व मतदान केंद्रांवर वीज, पाणी, शौचालय व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मतदारांना त्रास होण्याची शक्यता असून, मतदान केंद्रांवर मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी २ हजार १८५ ईव्हीएम बॅलेट युनिट, २ हजार १८५ कंट्रोल युनिट व २ हजार १८५ व्हीव्हीपॅट २१८५ मशीन मतदान केंद्रांवर पोहोचल्या आहेत.

ओळखपत्र नसेल तर हे सोबत आणा
मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. इतर १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार असून त्यात या कागदपत्रांचा समावेश आहे

  • पासपोर्ट
  • वाहनचालक परवाना केंद्र अथवा राज्य शासन, तसेच कर्मचाऱ्यांना वितरित केलेले ओळखपत्र बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह दिलेले पासबुक पॅनकार्ड जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड मनरेगाचे ओळखपत्र
  • निवृत्तीवेतनाचा दस्तावेज संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांनी दिलेले ओळखपत्र
  • आधारकार्ड दिव्यांगांचे विशेष ओळखपत्र आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.