शिवसेनंचं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे? उद्धव ठाकरेंचा सवाल, भाजपवर ओढले आसूड

>> विशाल अहिरराव, नाशिक

प्रभू रामचंद्र हे एकवचनी, सत्यवचनी होते. मग ज्या शिवसेनेनं तुम्हाला सत्तेच्या गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनंचं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकतात? असा खणखणीत सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जबरदस्त आसूड ओढले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या दिवशी नाशिक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या राज्यव्यापी अधिवेशनावेळी नेते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन केलं. आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणाऱ्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. त्याच सोबत राम की बात झाली आता काम की बात करा! असं म्हणत पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपला सुनावलं. हिंदुत्व आणि स्वातंत्र्य आम्हाला शिकवू नका असं म्हणत त्यांनी भाजपला ठणकावलं. तसंच महाराष्ट्र पण देश जिंकणार असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्तानं सारी नाशिक नगरी भगव्या पताकांनी सजली आहे. या अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पक्षाचे जवळपास दीड हजार पदाधिकारी उपस्थित होते. तर मंगळवारी संध्याकाळी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार असून मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या आधी आज सकाळी नाशिकच्या सातपूर येथील डेमोक्रसी क्लब येथे शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात आलं. जयश्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेना झिंदाबाद, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता.

आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या अरेरावी धोरणांना लक्ष्य केलं. ‘आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक तडाखे दिले.

‘मी श्रीरामचंद्रांचा अनुयायी म्हणून बरोबर आहे. पण तुम्ही माझी तुलना श्री प्रभूरामांसोबत केली नाही यासाठी धन्यवाद देतो’, असं म्हणतानाच राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी आणि छत्रपती शिवराय यांची तुलना करणाऱ्यांचा समाचार घेतला. ‘काल अंधभक्त तिथे जमले होते. त्यांचे सगळ्यांचे जे ज्ञान आहे, जी काही बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी. पण कोणीतरी एकाने आजचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान म्हटलं. अजिबात नाही त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते. तर आज राममंदिर उभे राहूच शकले नसते’, अशा शब्दात फटकारलं.
‘आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच. नाहीतर हे कोणाही येड्यागबाळ्याचं काम नव्हतं’, असं त्यांनी ठणकावलं.

अयोध्येला भेट देण्याच्या मुद्दाला हात घालत त्यांनी जुनी 2018 ची आठवण पुन्हा एकदा करून दिली आहे. ‘आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2018च्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो. मी अयोध्येला चाललो आणि गेलो होतो. अयोद्धेला कधी येणार, अयोध्येला कधी येणार. आज मोदी अयोध्येला गेले त्याच्या आधी कधी गेले नव्हते’, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘कदाचित पंतप्रधान होण्याआधी गेले असतील, जसे आमचे फडणवीस गेले होते असे म्हणतात तसे’, असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला.

‘इतके वर्ष अयोध्येचा विषय चाललेला आहे, थंड बस्त्यात पडलेला आहे. काय मनात आले मी म्हंटलं चला शिवनेरीला जाऊ. शिवजन्मभूमीची एक मूठभर माती घेऊन राम जन्मभूमीवर जाऊ. तुम्ही माना अथना नका मानू. पण 2018मध्ये नोव्हेंबरला अयोध्येला गेलो होतो. थंड बस्त्यात पडलेला हा विषय होता तो अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा निकाल दिला. हा मला वाटतं त्या मातीचा महिमा आहे’, अशी आठवण त्यांनी करून दिली.

आजच्या अधिवेशनात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना शिवनेरीची ही माती देण्यात येणार असल्याचं सांगतानाच त्यामागचं कारणही स्पष्ट केलं. ‘ही माती जिल्ह्याजिल्ह्यात राज्याराज्यात न्यायला का सांगतोय तर आज गरज आहे. जसं त्यावेळी जे हिरवं वादळ आलं होतं. संपूर्ण वाताहात चालली होती आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला. आणि महाराष्ट्राने देश वाचवला हे सत्य आहे. औरंगजेबानं संभाजी महाराजांना निर्घृणपणे मारलं त्याच्यानंतर तो हे राज्य गिळायला बसला होता. छत्रपती महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांना आता असे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज आता नाही आहेत. संभाजी महाराज नाही आहेत त्यामुळे आता महाराष्ट्राला गिळायची वेळ आली आहे. शेवटी त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मुठमाती दिलीच. हा सुद्धा इतिहास आहे आणि ते सत्य आहे. जो जो महाराष्ट्राच्यावरती आला त्याला मुठमातीच दिली आहे’, असं त्यांनी अधोरेखित केलं.

‘प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा पक्षाचे मालमत्ता नाही. जर तुम्ही तसे करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजपमुक्त श्रीराम करावे लागेल. नुसतं जय श्रीराम नाही तर भाजपमुक्त जय श्रीराम’, असं त्यांनी ठणकावलं.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात रामजन्मभूमीच्या कारसेवकांची आठवण करून दिली. ‘ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं, शिवसैनिक तुमच्या सोबत होते, बाकी मी त्या सगळ्या इतिहासात जात नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज काही कारसेवक आहेत, तर काही आपल्यातून निघून गेले. मग हे श्रेय कोणी घ्यायचे. घेतले तर घ्या. माझे काहीच म्हणणे नाही. पण निदान प्रभू श्रीरामांचा एकतरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी कळूद्या. प्रभू रामचंद्र हे एकवचनी, सत्यवचनी होते. मग ज्या शिवसेनेनं तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनंचं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकतात? असा खणखणीत सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आसूड ओढले.

रामायणात प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाची पत्नी पळवणाऱ्या वालीचा वध केल्याची घटना आहे. त्या घटनेचा उल्लेख करत
‘ज्यांनी माझी, माझ्या भगव्याची प्रतारणा केली आणि आपली स्वत:ची हक्काची शिवसेना पळवणारे कोणी वाली असतील नाहीतर, त्यांचा कोणीही वाली असेल त्यांचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही हा खरा निर्धार करा’, असं आवाहन त्यांनी शिवसेना नेते पदाधिकारी आणि शिवसैनिकांना केलं.

राममंदिर उभं राहिलं तेव्हा आता जनतेच्या प्रश्नांकडे लक्षं द्या असं म्हणाताना ‘सगळं रामामय झालेलं आहे, पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत. कालचा इव्हेंण्ट झाला. ‘राम की बात’ झाली आता ‘काम की बात’ करा, असं त्यांनी ठणकावलं.

आता देशाला समर्थ करणार म्हणत आहात मग 10 वर्ष काय केलं? अंडी उगवत होतात का? असा सवाल त्यांनी केला.

पहिल्या पाच वर्षात पंतप्रधान जगभर फिरत होते. पण अयोद्धेला गेलेले नव्हते. आतासुद्धा लक्षद्वीपला गेले, मणीपुरला गेले नाहीत, असा मुद्दा छेडत त्यांनी यावर सभेत बोलेन असंल सांगितलं.

अरविंद सावंत, अंबादास दानवे यांनी मांडलेल्या विषयांचा देखील उद्धव ठाकरे यांनी भाषणावेळी उल्लेख केला. ‘आता जे विषय मांडले, कामगार सगळा बेकार होतोय, गेल्या वर्षभरात, काही महिन्यात अमरावतीत जिल्ह्यात जवळपास 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पिक विमा मिळाला, नुकसान भरपाई मिळाली, नोकऱ्या मिळाल्या? दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत? जगाला राम राम म्हणून सर्वांना भारावून टाकलं जात आहे’, असं त्यांनी सांगितलं.

वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांच्या गळचेपीवर देखील उद्धव ठाकरे आपल्या भाषणात बोलले. ‘आता कोणाला तरी पकडतात. मग यांच्यामुळे मला हक्काचं घर मिळालं. सब झुठ है , अजबात नाही. सगळी चॅनल त्यांना दोष देत नाही. पण दबाव एवढा आहे की, ते जे म्हणतील तेच दाखवावं लागतं आणि आता सुद्धा कल्पना नाही. काही ठिकाणी लाईव्ह दाखवत असतील तर केबलसुद्धा बंद केले जातात. हे तुमचं रामराज्य? अरे हिंमत असेल तर या समोरा समोर मैदानात या ना मग बघू कोण काय आहे ते? मैदानात या’, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं.

आज जे माझे शिवसैनिक आहेत, मी माझे म्हणतो कारण ती वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय मी घराणेशाहीवाला असेन. पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे. म्हणून माझे हे शिवसैनिक मला वारसा हक्काने मिळालेले आहेत चोरून मिळालेले नाहीत. जे तुमच्यासाठी लढले. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही देखिल प्रचार केला होता. मी सुद्धा केला होता. त्यावेळी आम्ही कोणी भ्रष्टाचारी नव्हतो. जे वर्षानुवर्षे शिवसैनिकांनी खस्ता काढल्या. तुम्हाला दिल्ली दिसली असती का? तुमच्या पुचाट भाजपवाल्यांमुळे दिल्ली दिसली नाही. माझ्या वीर मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे. ते सर्व शिवसैनीक गुन्हेगार. अनिल परब गुन्हेगार, रविंद्र वायकर, किशोरीताई, सुरज चव्हाण हे गुन्हेगार? जेव्हा मुंबईत दंगली पेटल्या होत्या त्यावेळी हे माझे शिवसैनिक आहात, तुम्ही सर्व आहात त्यांनाी गावागावत हिंदूंचे रक्षण केले होते. आम्ही विचारत बसलो नाही शिवसेनेचा की भाजपचा आहेस? पण यांनी तिकडे मार खाल्ला आहे. पोलिसांनी तुडवलेले आहे, लष्कराने तुडवलेले आहे तुरुंगवास भोगलेला आहे. श्रीकृष्ण अहवालाच्या माध्यमातून जो अहवाल आला आपण केराच्या टोपलीत टाकला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. वाजपेयीजींनी सांगितलं होतं नितीमत्ता ना? ऐसा नही करना चाहीए. मग घेतला आणि गीता म्हणून पूजन केले. कारण त्यांना माहित होतं यात भाजपवाले नाही सापडणार शिवसैनिक सापडणार आहेत. भाजपवाले होते कुठे? आज हे माझे शिवसैनिक त्यांच्यावर आज खोटे आळ घालतायतं, अशा शब्दात त्यांनी सुनावलं.

निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काढले गौरोवोद्गार

आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल गौरोवोद्गार काढले. ‘राजन साळवी आहेत. आता भेटले आणि म्हणाले झुकणार नाही. संजय राऊत तुरुंगात जाऊन आले. हे अचानक सर्व भ्रष्ट वाटायला लागले. आणि आम्ही जे तुमचे भ्रष्टाचाराचे पाढे आम्ही वाचतो त्याच्या चौकशा लावा ना? आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत’, असं त्यांनी ठणकावलं.

मुंबई महापालिकेचा घोटाळा काढतायंत. कोरोना काळात घोटाळा झाला. काढा! ठाणे महापालिका, पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर काढा माझे तर म्हणणे आहे की पीएम केअर फंडाचासुद्धा घोटाळा काढा. पीएम केअर फंड म्हणजे हास्यजत्रेतला प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता तो? अरे वसाड्या पैसे दे. पीएम केअर फंड म्हणजे पंतप्रधान मदत निधी तो म्हणे खासगी आहे मग तो कोणाचा आहे. तो घेऊन जाणार का घरी? मग त्याच्यामध्ये जे लाखो करोडो रुपये जमवले ते कोणाकडे गेले त्याचा हिशोब द्या आणि माझ्या भ्रष्ट नसलेल्या शिवसैनिकांवर भ्रष्ट बुद्धी वाल्यांनो भ्रष्टातचाराचे आरोप करा, अशा शब्दात त्यांनी सुनावलं.

संजय राऊतांचे ‘सा’मनाचे श्लोक

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला जोरदार भाषण केलं. आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं. संजय राऊत यांनी भाषणात रामायणातले बारकावे सांगितले. म्हणजे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते, तसे यांनी ‘सा’मनाचे श्लोक सांगितले. म्हणजे सामना कसा करावा म्हणून ‘सामनाचे’ श्लोक, अशी कोटी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

स्वातंत्र्य आणि हिंदुत्व काय आम्हाला शिकवू नका!

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लिगसोबत सरकार स्थापन करून चले जाव जळवळ कशी चिरडली होती या इतिहासाची उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली. स्वातंत्र्य काय आम्हाला शिकवू नका, हिंदुत्व काय आम्हाला शिकवू नका, आम्ही आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. श्रीरामाचे आहोत, भवानी मातेचे आहोत पण हे कलश घेऊन तुम्ही जाल तेव्हा आता जनता न्यायालय पाहिलत ना, हे लबाडाचं ढोंग पाहिलत ना तुम्ही, हा बुरखा आता तुम्हाला फाडावा लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला एक कार्यक्रम दिला होता की होऊन जाऊ दे चर्चा तो आता पुन्हा सुरु करा आणि त्या चर्चेला सुरु करताना हा जो कलश आहे ती फक्त माती नाहीय प्रेरणेच मोठ स्थान आहे. छत्रपती शिवारायांच्या तेजाचे अंश आहेत कण आहेत ते महाराष्ट्रामध्ये घेऊन जा आणि पुन्हा महाराष्ट्र पेटवा. त्यांना जर वाटत असेल की ते म्हणजे देश, ते म्हणजे प्रभु रामचंद्र पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही आम्ही होऊ देणार नाही, असं त्यांनी ठणकावलं.

महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार!

आपण महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार, असा विश्वास व्यक्त करतानाच ‘आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी, माझ्या भारत मातेसाठी आहे. भारतमातेला तेव्हा परक्यांच्या त्यांच्या जोखड्यातून मुक्त केली त्याचेच वंशज आम्ही आहोत. तुमचा वंश वेगळा असेल कारण तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. म्हणून पुन्हा भारतमाता भले आमचे स्वकीय जरे असले तरी तुमच्या जोखडात अडकू देणार नाही हा एकच निर्धार करा’, असं आवाहन त्यांनी यावेळी करत आपलं भाषण संपवलं.