Nagar news – अवैध धंद्याविरुद्ध शिवसेना आक्रमक; मुख्य सूत्रधारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कोपरगाव शहरातील एसटी स्टँड परिसरात आठवडी बाजाराच्या दिवशी अवैध धंद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या मुद्द्यावर नागरिकांसह शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधारावर गुन्हे दाखल करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही धंदे बंद करू, असा इशारा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी दिला.

कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. कोपरगाव शहरात सोमवारी बाजाराच्या दिवशी बस स्थानक परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने शहरात काहीकाळ तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत एक शिवसैनिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्या हाणामारीतील मुख्य सूत्रधारासह त्याच्या इतर साथीदारावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अवैद्य धंदे बंद होत नसल्यास शिवसेना स्टाईलने आम्ही अवैध धंदे बंद करू आणि त्यांना धडा शिकवू, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. शहर पोलीस ठाण्यात कोपरगावमधील काही ग्रामस्थांसह शिवसेनेचे निलेश धुमाळ, माजी शहरप्रमुख भरत मोरे, मनोज कपोते, बालाजी गोर्डे आदींनी निवेदन देऊन पोलिसांशी चर्चा केली.

कोपरगाव परिसरात मटका, गुटखा, गोवा बनावटीची अवैध मार्गाने येणारी दारू, जुगार आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आणि राजरोसपणे सुरू आहेत. अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. त्या विरोधात पोलीस प्रशासन काय करत आहे असा सवाल निलेश धुमाळ व भरत मोरे या पदाधिकाऱ्यांनी केला. शहरातील अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी नयन संजय मेहेरे (वय 27, रा गांधीनगर, कोपरगाव) यांच्या तक्रारीवरून आझर शेख, राजु डगळे, इरफान शेख, फौजल सैय्यद व इतर दोन ते तीन अनोळखी (सर्व रा. कोपरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल डी आर तिकोने करीत आहेत.