आदित्य ठाकरे यांचा निशाणा मिंधेंच्या वर्मी लागला; दावोसला निघालेल्या वऱहाडातून सात जणांना वगळले

स्वित्झर्लंडच्या दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेला मुख्यमंत्र्यांबरोबर जाणाऱया 50 जणांच्या शिष्टमंडळावरून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली तिखट टीका मिंधे सरकारच्या वर्मी लागली आहे. त्यामुळेच दावोस शिष्टमंडळातून मुख्यमंत्र्यांनी आता सात जणांना वगळले आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली. मात्र दौऱयातून कमी करण्यात आलेल्या नव्या शिष्टमंडळाची माहिती मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे का आणि परराष्ट्र मंत्रालयाने याला परवानगी दिली आहे का, असा खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून विचारला आहे.

दावोसमध्ये होणाऱया जागतिक आर्थिक परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब जाणार आहेत. पण त्याचबरोबर राज्याबरोबर होणाऱया विविध गुंतवणूक करारांसाठी 50 जणांचे शिष्टमंडळही बरोबर नेणार होते, मात्र दावोसचा अनुभव पाहता तिथे केवळ 10 ते 12 जणांची टीम आवश्यक असते. मग इतक्या व्यक्ती आणि शिष्टमंडळाची दावोस दौऱयासाठी गरज आहे का, असा प्रश्न विचारून दौऱयावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा आणि महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल तेही स्पष्ट करा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन उद्योगमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री कार्यालयाने सात जणांना दौऱयातून वगळले.

किरकोळ करारांची माहिती केली उघड
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या तिखट टीकेमुळे घाबरलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाने घाईघाईने दावोस दौऱयाची केवळ किरकोळ माहिती आणि तेथे होऊ घातलेल्या काही करारांची माहिती उघड केली आहे. गंमत म्हणजे एकीकडे उद्योगमंत्र्यांनी करारांची माहिती उघड करायला पत्रकार परिषदेत नकार दिला असताना त्याचदरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने हे तपशील जाहीर केले, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून दिली.

मुख्यमंत्र्यांची कोंडी करणारे प्रश्न
1.जवळपास 50 लोक या दौऱयावर जाऊन काय करतील? त्यांनी नावे जाहीर करण्याआधी आम्हीच ती नावे जाहीर करू का?
2. मुख्यमंत्र्यांना 1 पीएस, 1 पीए, 7 ओएसडी, 5 पदे नसलेल्या व्यक्ती, दलाल आणि फिक्सर, 3 पीआरओ आणि प्रचारकांची गरज का आहे?
3.उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित नसताना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडीसोबत असण्याची आवश्यकता का पडावी?
4. सध्याचे खासदार आणि माजी खासदारदेखील शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. शिष्टमंडळात त्यांची नेमकी भूमिका काय?
5. सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित विभागातील फक्त एक अधिकारी आवश्यक असतो, अख्खा लवाजमा नाही.
6. उद्योगमंत्र्यांनी सांगितले आहे की, काही जण स्वखर्चाने दावोसला जाणार आहेत! वाह! हे नक्की कोण कोण आहेत? त्यांची नावे आणि पद किंवा दावोसमधल्या त्यांच्या जबाबदाऱया जाहीर करा!