शिवसेनेचा दणका, ‘बेस्ट’ तिकीट दरवाढ टळली; आदित्य ठाकरे यांचा पाठपुरावा

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला मदत करण्यास नकार देणाऱया बेस्ट प्रशासनाने शिवसेनेच्या दणक्यानंतर तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय मात्र मागे घेतला आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱया आणि गोरगरीबांसाठी हक्काची वाहतूक सेवा असणाऱया बेस्टची दरवाढ करू नये, अशी जोरदार मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारीच केली होती.

आदित्य ठाकरे यांच्या पत्राची दखल घेत बेस्ट प्रशासनाने दखल घेत सद्यस्थितीत बेस्टची कुठलीही भाडेवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे माहिती दिली.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणाऱया ‘बेस्ट’ला आर्थिक संकटात असताना मदत करण्यास नकार देणारी पालिका ‘एमएमआरडीए’ला मात्र आर्थिक मदत करीत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना गाडय़ांची संख्या वाढवण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्मचाऱयांची कोटय़वधीची देणी थकवली जात आहेत. त्यामुळे ‘मिंधे’ सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडात ‘बेस्ट’ डबघाईला आली आहे. त्यामुळे ‘मिंधे’ सरकार ‘बेस्ट’ बस सेवा संपवून पंत्राटदार मित्रांच्या खासगी सेवेला देऊन घशात घालण्याचा डाव आहे का, असा सवाल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन देत दरवाढ मागे घेऊन आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती.

‘मिंधे’च्या राजवटीत महाराष्ट्राची लूट

गेली अनेक वर्षे बेस्ट ही ‘सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त सेवा’ अशी ओळख असणारी सेवा होती. मिंधे भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातच अर्थसहाय्य बंद करून बेस्ट संपवण्याचा डाव आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.