मराठी संपवण्याची इच्छा असणाऱ्यांना मराठी एकजूट दाखवा; उद्धव ठाकरे कडाडले

मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या उद्धारासाठी अखंडपणे झटणाऱ्या शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून गुरुवारी भव्य मराठी भाषा दिन सोहळा आयोजित करण्यात आला. न्यू मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात या सांस्कृतिक सोहळय़ात मराठीचा जागर करण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या अखंड पाठपुराव्यानंतर मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर हा सोहळा होत असल्यामुळे याचे आकर्षण होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेबाबत परखड मत व्यक्त केले. यावेळी गर्व से कहो हम हिंदू है, स्वाभिमानाने म्हणा मी मराठी आहे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र आणि मराठी संपवण्याची काही जणांची इच्छा आहे, त्यांना आपली मराठी एकजूट दाखवा असेही उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगितले.

आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. हिंदू हे काय धोतर आहे सोडायला? त्याकाळी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुखांना गर्व से कहो हम हिंदू है हे घोषवाक्य दिले होते. आता गर्व से कहो हम हिंदू हे, तसेच मी मराठी आहे, हेदेखील स्वाभिमानाने म्हणा. मराठी माणासाला स्वाभिमानाने जगण्यासाठीट शिवसेना आहे. आपल्या प्रत्येक सणाला इंग्रजीत शुभेच्छा देण्यात येतात. त्यादेखील स्वच्छ, शुद्ध मराठीत देण्याची गरज आहे. अमृताते पैजा जिंकणारी मराठी आहे. तिची चिंता करण्याची काय गरज आहे. आपण मराठी भाषा दिन अनेक वर्षे साजरा करत आहोत. पण याला चिंतेची किनार आहे. गद्दारी करून आपले सरकार पाडल्यानंतर आता हमे मराठी नाही आती, असे आपल्याला ऐकून घ्यावे लागत आहे. असा आवाज आल्यावर ते बोलणाऱ्यांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघाला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले .

आपण मराठीचा अभिमान जपायला हवा. पण इतर भाषेचा दुस्वास करा, असा याचा अर्थ नाही. मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तरी घरी मराठीचे संस्कार देणे गरजेचे आहे. सातवीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी पैसे नसतानाही माझे आजोबा प्रबोधनकार झाले. फी नसल्यामुळे शाळा सोडावी लागलेले बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट झाले. आपण मराठीचे शिक्षण सक्तीचे केले होते. आपल्याकडे भाषेच्या मुद्द्यावर अजूनही एकजूट दिसत नाही. आपल्याला मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारावी लागणार आहे. देशातील दोन जणांना मराठी संपवायची आहे. हम करे सो कायदा, असे त्यांचे धोरण आहे. त्यांना महाराष्ट्र, मराठी माणूस संपवायचा आहे, येथील उद्योगधंदे राज्याबाहेर नेत मराठी माणसाच्या हातात कटोरा द्यायचा आहे. मात्र, मराठी माणूस त्यांचा हा कटोरा त्यांच्या चेहऱ्यावर फेकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात त्यांनी किती टाळाटाळ केली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर याची घोषणा केली. हे सर्व जनतेला माहिती आहे. आता आपल्या जगण्यातून आपण मराठी आहोत, हे जाणवून दिले पाहिजे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे मराठी माणसाने जगण्याची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीचा अभिमान वाटावा, असे आपल्याला वागले पाहिजे.मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान बोललो. तसेच संमेलनाच्या अध्यक्षा भवानकर जे बोलल्या त्याचा विचार व्हायला हवा. आपला जन्म जैविक नाही, असा दावा करणाऱ्यांवर त्यांनी परखडपणे विचार मांडले. त्यानंतर त्या कुंकवाबाबात बोलल्या. याचा विचार होण्याची गरज आहे. आपल्या देशाचे यान मंगळवार गेले म्हणून आपण आनंदी होतो. पण इथे आपण पत्रिकेत मंगळ शोधतो. आपण कोणत्या दिशेने जात आहोत. याचा विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.