लाडकी बहीण योजनेतून मतं विकत घेण्यासाठी निवडणूक लांबवली, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच लाडकी बहीण योजनेतून मतं विकत घ्यायची आहेत म्हणून निवडणूक लांबवली, असा घणाघातही त्यांनी केला.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुमच्या योजना राजकीय फायद्यासाठी आहे. ज्या मतदारांना प्रभाव टाकण्यासाठी आणि मतदान विकत घेण्यासाठी आहे. सरकारी पैशांतून त्यासाठी वेळ मिळावा म्हणून निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बाहुलं बनलं आहे. देशातलं संविधान, राज्यघटना धोक्यात आहे. ज्या संस्थांनी निष्पक्ष राहणे अपेक्षित होतं, त्याच संस्था जर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर या देशात संविधान राहिलंय कुठे? महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात, राजकारणात पराभवाची भिती वाटते त्यांनी अशा प्रकारे डाव टाकलेला आहे. झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका हरयाणासोबत व्हायला हरकत नव्हत्या. पण झारखंडची निवडणूक यासाठी पुढे ढकलली की झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष फोडायचा आहे. महाराष्ट्रात अशाच राजकीय कारणांसाठी या राज्याच्या निवडणुका घेत नाहीत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायती कोणत्याही निवडणुका निवडणूक आयोग आणि सरकार घ्यायला तयार नसेल याचा अर्थ ही हुकुमशाहीच आहे. देशात राज्यघटना कुठे आहे, संविधान कुठे आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

झारखंड आणि महाराष्ट्रात भाजपचा वाईट पद्धतीने पराभव होणार आहे. महाराष्ट्रात तर भाजपचा सुपडा साफ होणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जास्त पैसे द्यायचे आहेत, मतं विकत घ्यायची आहेत म्हणून या दोन राज्यातल्या निवडणुका लांबवल्या आहेत. ही संविधानाच्या विरोधात आहे. निवडणूक संविधानाविरोधात काम करत आहे असेही संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाहीत. एक वेळ होती लोक त्यांना ऐकत होती. गेल्या पाच वर्षांपासून फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर गेले आहेत. त्यांचे अस्तित्व उरले नाही. त्यांचेच लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. फडणवीस आता दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. एक माणून बेईमानी करून आला आणि तो मुख्यमंत्री होऊन त्यांचा बॉस झाला. आम्ही सत्तेत आलो तर लाकडी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू. सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील असे पंतप्रधान मोदींनी म्हणाले होते. पण आता काही ठराविक महिलांना पंधराशे रुपये देत आहेत असेही संजय राऊत यांनी नमूद केले.