खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या अधिवेशनात भ्रष्टाचारी मिंधे सरकारला घेरण्याची पुरती तयारी महाविकास आघाडीने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बुधवारी मिंधे सरकारवर टीका केली. उद्यापासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन हे महायुतीच्या खोके सरकारचे निरोपाचे अधिवेशन आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह आज मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघाची परंपरा पाहिली तर मुंबईतील पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदारही शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री असून पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा विजय उघड आहे, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लोकसभेतील घडामोडींबाबतही माध्यमांनी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर आज निवडणूक असल्यामुळे राजकीय विषयावर बोलणार नाही, पण अधिवेशनात राजकीय भूमिका मांडेन, असे ते म्हणाले.