आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे फुंकणार विधानसभेचे रणशिंग!

मोदी – शहांची मस्ती उतरवल्यानंतर आता महाराष्ट्र गद्दारमुक्त करणार!!

अरे हा आवाज कुणाचा…असली शिवसेनेचा!

स्थळ – षण्मुखानंद सभागृह, किंग्ज सर्कल

वेळ – सायंकाळी 6.30 वाजता

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि तेजस्वी विचारांतून स्थापन झालेल्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन उद्या मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा दिमाखात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी मोदी-शहांची मस्ती उतरवत दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र गद्दारमुक्त करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला असून त्या लढाईचे रणशिंगच उद्धव ठाकरे उद्याच्या सोहळ्यात फुंकणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका कोणता संदेश देतात आणि कोणती राजकीय भूमिका मांडतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा उद्या सायंकाळी 6.30 वाजता षण्मुखानंद सभागृहात होणार असून या सोहळ्याला शिवसेना नेते-युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठय़ा संख्येने सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

विजयाचा सोहळा

शिवसेनेचा दरारा अटकेपार आहे. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी, हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि प्रखर राष्ट्राभिमानाचा जागर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी स्थापन केलेला हा पक्ष अनेक संकटे परतवून लावत घोडदौड करत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिंधे, भाजप आणि दादा गटाची दाणादाण उडवत शिवसेनेने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले असून उद्याचा वर्धापन दिन जणू आनंद आणि विजयाचा सोहळाच ठरणार आहे.

स्थापना दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेची उद्या सुरुवात केली  जाणार आहे. 2024 ते 2026 असा या सदस्य नोंदणीचा कालावधी असेल.

9 विजयी शिलेदारांचा सत्कार

शिवसेना नेते अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर या  शिवसेनेच्या 9 शिलेदारांनी लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या विजयीवीरांचा या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

पहिली लढाई जिंकली

सध्याच्या भाजप नेतृत्वाचा महाराष्ट्राबद्दलचा द्वेष कायमच दिसून आला आहे. त्याच द्वेषातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेना फोडली. गद्दार मिंधेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवून मूळ शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदी-शहांची सगळी कारस्थानं कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी हाणून पाडली. लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा जोडीने महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सभा घेतल्या. मात्र, त्यानंतरही त्यांची डाळ शिजली नाही. असली शिवसेनेने भाजप आणि त्यांच्या मिंध्यांना पाणी पाजले. महाराष्ट्रात 40 जागा जिंकणार, असे दावे करणाऱ्या महायुतीला 17 जागांपर्यंत खाली खेचले. भाजप तर इतका आपटला की सिंगल डिजिटवर आला. ही लढाई जिंकल्यानंतर आता विधानसभेची लढाई लढण्यासाठी शिवसैनिक सज्ज होत आहे.

तयारी पुढच्या लढाईची

शिवसेनेशी गद्दारी करणारे मिंधे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष खदखदत आहे. लोकसभा निवडणुकीत पहिला दणका दिल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गद्दारी याच मातीत कायमची गाडण्यासाठी आणि महाराष्ट्र गद्दारमुक्त करण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. लोकसभेतील विजयाचा जल्लोष करत असतानाच पुढच्या लढाईसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या लढाईचे रणशिंग उद्धव ठाकरे शिवसेना वर्धापन दिनाच्या सुवर्णक्षणी फुंकणार असून उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक आतुर आहे.

महाविकास आघाडीची वज्रमूठ

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम एकजूट उभी राहिली आहे. भाजपचा उधळलेला वारू जमिनीवर आणण्यात या आघाडीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही एकजुटीने लढून महाराष्ट्राची सत्ता पुन्हा खेचून आणण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केला आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्रातील घडामोडींकडे लागले आहे. विधानसभा निवडणूक येत्या चार महिन्यांत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे उद्याचे भाषण राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे आहे.