माफीचा जुमला नको, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या! महाविकास आघाडी आक्रमक

मालवणच्या राजकोटवरील शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर माफी मागितली. मात्र दुर्घटनेच्या पाच दिवसांनंतर मोदींना जाग आली का, असा संतप्त सवाल सर्वत्र केला जात आहे. राजकीय वर्तुळातही मोदींच्या माफीवरून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही माफी म्हणजेही आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला जुमला आहे, अशी टीका होत आहे. माफीचा जुमला नको, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता तर मोदींच्या माफीवर विश्वास बसला असता 

 मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता तर मोदींच्या माफीवर विश्वास बसला असता, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी माफी मागितली, अशी टीकाही त्यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. शिवपुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ताशी 45 कि.मी. वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला. शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, काहीतरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला. सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली जबाबदारी टाळून नौदलाकडे बोट दाखवले. ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकारही फरार आहे. पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत, असे वडेट्टीवार यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

भ्रष्टाचाराला माफी नाही, प्रायश्चित्त अटळ आहे

भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे मोदी साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित्त अटळ आहे. जय शिवराय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

सावरकरांना मधे आणून मोदींची सशर्त माफी

पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी ती सशर्त माफी आहे, कारण माफी मागताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मधे आणले, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पंतप्रधान आणि भाजपाला महाराजांच्या पुतळ्याचा इव्हेंट करायचा आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप आहे. नुसती माफी मागून चालणार नाही, जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

मोदींनी माफी मागून चूक मान्य केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली म्हणजेच सरकारकडून चूक झाली हे मान्य केले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱया पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला. नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावली आहे. यांनी सत्तेतून बाहेर व्हावे नाहीतर महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही पटोले यांनी दिला.

उशिरा माफी मागता, तुमचे सरकार महाराष्ट्रातील जनताच कलम करेल

शिवपुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाच दिवसांनंतर माफी मागितली. पण शिवशाहीत अशा गुह्याला माफी नव्हती, तिथे कलमच केले जात होते आणि आता मोदींच्या सरकारला महाराष्ट्रातील जनताच कलम करेल, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मालवणातील शिवरायांचा पुतळा मोदींच्याच इथल्या सरकारने उभारला होता. या पुतळ्यासाठी झालेले व्यवहार पाहिले तर त्यात सरळसरळ भ्रष्टाचार दिसतो. आधी वर्प ऑर्डर काढली गेली आणि नंतर टेंडर भरले गेले. 2 कोटी 40 लाख रुपये पुतळ्याला आणि सव्वा दोन कोटी रुपये मोदींची हेलिकॉप्टर उतरायला खर्च केले. असा नुसता भ्रष्टाचाराचा विळखा मिंधे सरकारने घातला होता, असे अंबादास दानवे म्हणाले.

याची उत्तरे द्यादानवेंनी उपस्थित केले सवाल

n ज्या लोकांचे नाव या समितीमध्ये घेतले आहे, त्या लोकांनी कधी साधा मातीचा गणपती तरी हाताने बनवला आहे का? ते पडलेल्या शिल्पाचा अभ्यास करण्यास पात्र आहेत का?

n किती उंचीचा पुतळा येथे उभारायचा, याचा शास्त्रीय अभ्यास झाला होता का? खालील बेटाची ताकद जोखून हा पडलेला पुतळा उभा झाला होता का? की कोणाची तरी राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणून मनाने उंचीचा आकडा सांगितला गेला?

n राजकोटवर आजघडीला उपलब्ध बांधकाम सामुग्री वापरून उभारण्यात आलेली लालभडक तटबंदी किल्ल्याच्या मूळ अवशेषांचे वाटोळे करून उभारली गेली का?

n विद्यमान सदस्यांच्या प्रेमापोटी काही विद्वान माणसे मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली आहेत का?