शिवकुमार, शुभम आणि अख्तरचा थांगपत्ता लागेना; चार दिवस उलटले तरी शोधाशोध सुरूच

सराईत आणि डोकेबाज आरोपीला पकडण्यात हातखंडा असलेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करून सटकलेल्या आरोपींचा चार दिवस उलटले तरी थांगपत्ता लागलेला नाही. देशभरात पोलिसांची पथके कसून शोधमोहीम राबवीत आहेत. पण शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि जिशान अख्तर हे पोलिसांना चकवा देत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी लुकआऊट नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे.

शिवकुमार गौतम याने बाबा सिद्दिकी यांच्यावर जवळून गोळय़ा झाडल्या, तेही तर्किश बनावटीच्या पिस्तुलातून. त्यावेळी त्याच्यासोबत धर्मराज कश्यप आणि गुरनेल सिंह असे अन्य दोघे होते. गोळीबार केल्यानंतर तिघांनीही तेथून पळ काढला, पण धर्मराज आणि गुरनेल पकडले गेले. पण गोळीबार करणारा शिवकुमार काही पोलिसांच्या हाती तेव्हा लागला नाही. तसेच या हत्याकांडाची बिष्णोई गँग जबाबदारी घेत असल्याची समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून परत ती डिलीट करणारा शुभम लोणकर, जिशान अख्तर हेदेखील परागंदा झालेत. हत्याकांड घडल्यानंतर तत्काळ पोलिसांची पथके तयार करून पसार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. आरोपींना आम्ही सोडणार नाही. लवकरच त्यांना पकडले जाईल असे मुख्यमंत्री सांगू लागले. पण हत्याकांडाला चार दिवस लोटले तरी आरोपींचा ठावठिकाणा गुन्हे शाखेला लागलेला नाही.

सराईत व अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेची पथके शिताफीने पकडतात. मग या गुह्यातील आरोपींचा अद्याप शोध कसा लागत नाही, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. पनवेलपर्यंत शिवकुमार गेल्याचे समजले, पण त्यानंतर तो कुठे सटकला हेच अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. गुन्हा घडल्याच्या दोन दिवसांनंतर घटनास्थळ परिसरात पोलिसांना एक बॅग सापडली. त्यात शिवकुमारने वापरलेले तर्किश बनावटीचे पिस्तूल, आधारकार्ड मिळाले. याबाबतदेखील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सहा लाखांचा व्यवहार

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट शिजल्यानंतर तो तडीस नेण्यासाठी प्रवीण लोणकर याच्यामार्फत आणि हरीष कुमार निसाद याच्या करवी आरोपींना आर्थिक रसद व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. त्यातून कुर्ल्यात भाडय़ाने घर घेणे असो, दुचाकीची खरेदी, खाण्यापिण्यासाठी वापर करण्यात आला होता. आरोपींमध्ये जवळपास सहा लाखांचा हा व्यवहार झाल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे समजते.