दादर येथील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी नेण्यासंदर्भात अनोखा देखावा साकारला आहे. हा देखावा गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे.
भटक्या विमुक्त जाती आणि लोककलावंतांना पोटासाठी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात असा वर्ग हा शिक्षणापासून वंचित राहतो. नव्या शैक्षणिक धोरणामधून अशा वर्गाला ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण शिक्षण देऊन समृद्ध करू शकतो. हाच विचार घेऊन यंदा शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा देखावा साकारला आहे.
आदिवासी लोककलाकारांना लोककलेच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा घेऊन आपण सध्याच्या तांत्रिकी गोष्टींची माहिती दिली तर देखील आधुनिक युगात मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात, असे कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी सांगितले. डोंबारी लोककलेतून कसरत दाखविणारी मुलं उत्तम खेळ खेळणारे क्रीडापटू, निसर्गाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या ऊसतोड कामगारांची मुलं नैसर्गिक औषधोपचार माहीत असणारे डॉक्टर, पारंपरिकता जपणारी मुलं, उत्तम जेवण बनवणारे आचारी असे एक ना अनेक अवलिया आपल्या देशाला मिळू शकतात, याकडे सुमित पाटील यांनी लक्ष वेधले.
आदिवासी संस्थांना मदत
यंदा मंडळाच्या माध्यमातून शालेयपयोगी वस्तू या बाप्पाला प्रसाद म्हणून आणण्याचे आवाहन भक्तांना करण्यात आले. तसेच अन्य आवश्यक मदत ही मंडळाकडून भटक्या विमुक्त जाती, जमातीसाठी काम करणाऱ्या संस्थांना सढळ हाताने करण्यात येणार आहे.