विदर्भातील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत; विनायक राऊत यांची स्पष्टोक्ती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघाचे अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत. सर्व पदाधिकाऱयांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबतचा निर्णय आणि उमेदवारांची नावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने जाहीर केली जातील, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते-खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

विदर्भातील काही कार्यकर्ते आपल्यालाच खासदारकीसाठी उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगून कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे पक्षामार्फत सदर स्पष्टीकरण करण्यात येत आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षातर्फे लोकसभेची अधिकृत उमेदवारांची नावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्यवेळी जाहीर करतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी संभ्रमित होऊ नये, असे आवाहन विनायक राऊत यांनी शेवटी केले आहे.