मुंबईचे लुटारू शिवसेनेच्या प्रकल्पाचे श्रेय लुबाडताहेत, कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरे यांनी फटकारले

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया ‘कोस्टल रोड’चा प्रस्ताव सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी जुलै 2013 मध्ये मांडला. यानंतर या प्रस्तावाच्या परवानगीसाठी शिवसेनेने केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार झाला आहे. मात्र मुंबईचे लुटारू शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या प्रकल्पाचे श्रेय लुबाडताहेत, असा घणाघात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

‘कोस्टल रोड’चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर मिंधे आणि भाजपच्या श्रेय लाटण्याच्या वृत्तीचा निषेध केला आहे. 2017-18 मध्ये कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली. 2022 मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत प्रकल्पाचे 65 टक्के काम पूर्ण झाले होते. आम्ही दर आठवडय़ाला, प्रत्येक महिन्यात तेथे भेट देऊन कामाचा आढावा घेत होतो. देशातल्या सर्वात मोठय़ा टनेल बोअरिंग मशीनने प्रकल्पातील दोन महाकाय बोगदे खोदण्यात आले. कोविडच्या काळात हे मशीन आले तेव्हा पालिका अधिकाऱयांनी विचारले, याला काय म्हणायचे? त्यावेळी मी ‘मावळा’ हे नाव सुचवल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. टनेल बोअरिंग मशीनने मलबार हिलखालून समुद्राखालचा पहिला बोगदा बनवण्यात आला. त्यामुळे या टनेल बोअरिंग मशीनला ‘मावळा’ हे साजेसे नाव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा ‘मावळा’ अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळय़ांप्रमाणेच, ज्यांनी महाराजांना अशक्य कामातही यशस्वी मदत केली असा असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

निवडणुकीसाठी खटाटोप

महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररीत्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे अर्धवट कोस्टल रोडचे उद्घाटन करून निवडणुकीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. कोस्टल रोड आणि मुंबईशी यांचे अजिबात देणेघेणे नाही. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱयांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

फक्त वरळीहून मरीन ड्राइव्हला जाता येणार, तेही केवळ 12 तास!

कोस्टल रोडचे 83 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत लोकार्पण करण्याचा घाट घातला असला तरी पहिल्या टप्प्यात केवळ तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे केवळ वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग सकाळी 8 ते रात्री 8 असा केवळ बारा तासच सुरू राहणार आहे. उरलेल्या वेळेत कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि कोस्टल रोडला वरळी आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे काम करण्यात येणार आहे, तर संपूर्ण कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने 15 मेपासून सुरू होणार आहे.