मिंधे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव; खोटय़ा केसेस आणि छापेमारी
विरोधकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी ईडी, एसीबीचा वापर, शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी हायकोर्टात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मिंधे गटात प्रवेश करण्यासाठी राजन साळवींवर दबाव टाकला जात आहे. निवडणुका जवळ आल्याने सत्ताधाऱयांकडून ईडी, एसीबी यांसारख्या विशेष तपास यंत्रणांचा वापर करून पक्षांतरासाठी विरोधकांवर बळजबरी केली जात आहे. विरोधकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सूडबुद्धीने खोटय़ा केसेस व छापे टाकले जात आहे, असा दावा अनुजा साळवी यांनी याचिकेत केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्यात शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी छापेमारी केली. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली. तसेच कुटुंबीयांनाही आरोपी बनवून टार्गेट केले जात आहे, याकडे लक्ष वेधत अनुजा साळवी आणि त्यांचा मुलगा शुभम साळवी यांनी अॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेची गुरुवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गंभीर दखल घेतली. तसेच याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
सत्तेच्या गैरवापराची याचिकेतून पोलखोल
राजन साळवी यांनी मिंधे गटात प्रवेशास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने बेहिशेबी संपत्तीची तक्रार करून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला.
विरोधी पक्षातील नेत्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सत्ताधाऱयांकडून ईडी, एसीबी यांसारख्या तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात आहे.
विरोधक असल्यामुळे प्रतिमा मलीन करण्याच्या कुटील हेतूनेच आमदार राजन साळवी व कुटुंबीयांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
राजन साळवी व त्यांच्या कुटुंबीयांची जवळपास दोन वर्षांपासून चौकशी केली जात आहे. त्यात संशयास्पद काहीही हाती लागलेले नाही.