भाजपला हरवायचं, लोकशाही आणि संविधान वाचवायचं हाच अजेंडा, महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण!

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व जागांवर त्या त्या पक्षाच्या ताकदीच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यात सर्वांचे एकमत झाले असून वंचितसह महाविकास आघाडीतील प्रमुख चारही पक्षांचे जागावाटप सुरळीतपणे पार पडले आहे व येत्या दोन दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर दिली.

आज प्रत्येक जागेवर सविस्तर चर्चा झाली. कोण कुठून लढणार यावर खल झाला. कोण किती जागा लढणार हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. जिंकणं महत्त्वाचं आहे. भाजपला हरवायचे आणि राज्यात व देशात लोकशाही, संविधान आणि वंचितांचे रक्षण करणे हाच आमचा सर्वांचा अजेंडा आहे. प्रकाश आंबेडकर यांचीही हीच भूमिका आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि वंचितचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वंचितच्या प्रस्तावावर चर्चा

वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव दिसायला मोठा कागद असला तरी प्रत्यक्षात तसे नाही. गेली काही वर्षे त्यांनी अनेक मतदारसंघांत काम केले आहे. त्याची यादी त्यांनी दिली आहे. त्यांनी कोणताही फॉर्म्युला सांगितलेला नाही, असे संजय राऊत यांनी नमूद केले. वंचितने 27 जागांवर अजिबात दावा सांगितला नाही. त्यांनी केवळ इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संयुक्त पत्रकार परिषदेत होणार घोषणा

जागावाटपावर आजची बैठक निर्णायक होती. आता शेवटची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या प्रमुख नेत्यांची होईल. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

बैठक सुरू असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार सातत्याने दूरध्वनीवरून संपर्कात होते. बैठकीतील चर्चेचा तपशील जाणून घेत होते. सर्वकाही सुरळीत पार पडलं आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

वैयक्तिक नाही, आघाडी म्हणूनच चर्चा

चारही पक्षांची ताकद प्रत्येक मतदारसंघात आहे. पण राज्यात जागा अठ्ठेचाळीसच आहेत आणि त्या आम्हाला वाटून घ्याव्या लागतील, असे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही, असे राऊत यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.