विकासाचा कोट्यवधीचा मलिदा भुमरे पित्रा-पुत्रांनी खाल्ला : दत्ता गोर्डे

‘पैठण तालुक्यात विकासाच्या नावाखाली आलेला कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचे काम भुमरे पिता-पुत्रांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेले रस्ते उखडले असून, ग्रामीण भागात धुळीच्या लोटांमुळे नागरिक हैराण आहेत. नाथसागराच्या पायथ्याशी असलेल्या या मतदारसंघात दरवर्षी शेकडो टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागतो आहे. हे दुर्दैवी चित्र बदलण्यासाठी मतदारांनी व्होटिंग मशिनच्या क्रमांक एक वरील ‘मशाल’ चिन्हाचे बटण दाबावे. गद्दारांच्या खोकेबाजीला सडेतोड प्रत्युत्तर द्यावे,’ असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार दत्ता गोर्डे यांनी केले आहे.

पैठण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित कातपूर, नारायणगाव, पाचलगाव, दिनायतपूर व वरुडी या गावांमध्ये कॉर्नर बैठकांमध्ये ते बोलत होते. या प्रचारसभांसाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘पैठण तालुक्यातील सर्व सत्तास्थाने भुमरे कुटुंबाने काबीज केली आहेत. मग सामान्य कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या काय?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे रावसाहेब आडसूळ यांनी केला.

उद्या 7 रोजी सकाळी 7 पासून मुधलवाडी येथून प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. इसारवाडी, वव्वा, वडाळा, धनगाव, कातपूर, राहुलनगर, टाकळी, ढोरकीन व कारकीन येथे प्रचाराच्या ग्रामसभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती संत एकनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमनप्रल्हाद औटे यांनी दिली.